ओळख पटविल्याशिवाय रेशनचे धान्य मिळणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:21 AM2018-04-03T00:21:26+5:302018-04-03T00:21:47+5:30
अन्न व नागरी पुरवठा विभागाने १ एप्रिलपासून एईपीडीएस प्रणालीचा वापर रेशन दुकानदारांना अनिवार्य केल्याने यापुढे आधार लिंक व अंगठ्याचा ठसा पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने सोमवारी शहरातील रेशन दुकानदारांची बैठक घेऊन तशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्या व्यक्तीची ओळख पटविल्याशिवाय धान्य न देण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत.
नाशिक : अन्न व नागरी पुरवठा विभागाने १ एप्रिलपासून एईपीडीएस प्रणालीचा वापर रेशन दुकानदारांना अनिवार्य केल्याने यापुढे आधारलिंक व अंगठ्याचा ठसा पॉस यंत्रावर उमटल्याशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने सोमवारी शहरातील रेशन दुकानदारांची बैठक घेऊन तशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्या व्यक्तीची ओळख पटविल्याशिवाय धान्य न देण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले आहेत. गेल्या वर्षापासून शिधापत्रिकाधारकांना रेशनवरून धान्य देताना दुकानदारांनी पॉस यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली असली तरी, सर्वच शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक पुरवठा खात्याशी संलग्न करण्यात आलेले नसल्यामुळे तसेच काही शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक संलग्न असले तरी, त्यांचे अंगठे पॉस यंत्रावर जुळत नसल्याने अशा शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जात होते व त्यासाठी त्यांना धान्य दिल्याची पावती दिली जात होती. आता मात्र सर्वच शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक पुरवठा खात्याशी संलग्न करण्यात आल्यामुळे एईपीडीएस प्रणालीचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या संदर्भात सोमवारी शहर धान्य वितरण अधिकारी शर्मिला भोसले यांनी शहरातील रेशन दुकानदारांची बैठक घेऊन त्यात यापुढे पावत्याच्या आधारे रेशनमधून धान्य देणे बंद करण्याचे आदेश दिले. ज्या शिधापत्रिकाधारकाकडे आधार कार्ड नसेल अशा शिधापत्रिकाधारकाला दुकानातच बसवून ठेवावे व त्याबाबत संबंधित पुरवठा निरीक्षकांशी संपर्क साधण्यात यावा. पुरवठा निरीक्षक स्वत: रेशन दुकानात येऊन आधार कार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकाची ओळख पटवेल व त्यानंतरच त्याला धान्य दिले जावे, असे सांगितले. तर आधार क्रमांक जुळत नसल्यास स्वत: रेशन दुकानदाराने आपल्याकडील पॉस यंत्राच्या सहाय्याने आधार क्रमांक दुरुस्त करून घ्यावा, अशा सूचना दिल्या.
अंगठ्याचे ठसे पॉस यंत्रावर उमटत नाहीत
काही दुकानदारांनी वृद्ध व वयस्क व्यक्तींचे अंगठ्याचे ठसे पॉस यंत्रावर उमटत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता, आता प्रणाली अधिक अद्ययावत करण्यात आल्यामुळे तसे होणे अशक्य असल्याचे ठासून सांगण्यात आले, याउपरही तसे झालेच तर संबंधित व्यक्तीच्या आधार क्रमांकाशी ते जुळवून पाहण्याच्या सल्ला देण्यात आला. मात्र कोणत्याही परिस्थितीत आधार क्रमांक व बोटाचे ठसे जुळविल्याशिवाय धान्य वितरण न करण्याचे तसेच पॉस यंत्राशिवाय व्यवसाय न करण्याची तंबी देण्यात आली.