ॲम्फोटेरेसिन इंजेक्शनचा खडखडाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:08+5:302021-06-04T04:12:08+5:30

नाशिक : जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून असलेल्या ॲम्फोटेरेसिनच्या इंजेक्शनच्या तुटवड्यानंतर आता तर थेट खडखडाटाची स्थितीत पोहोचल्याने म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या ...

The rattle of amphotericin injection! | ॲम्फोटेरेसिन इंजेक्शनचा खडखडाट !

ॲम्फोटेरेसिन इंजेक्शनचा खडखडाट !

Next

नाशिक : जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून असलेल्या ॲम्फोटेरेसिनच्या इंजेक्शनच्या तुटवड्यानंतर आता तर थेट खडखडाटाची स्थितीत पोहोचल्याने म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंडांचा सामना करावा लागत आहे. आठवड्याच्या प्रारंभीच अर्थात सोमवारी आणि मंगळवारी ॲम्फोटेरेसिनचे एकही इंजेक्शन आले नाही तर बुधवारी शहरात आलेली १४० इंजेक्शन्स तर प्रति रुग्णाला किमान एक देणेदेखील शक्य झाले नाही. गुरुवारी पुन्हा इंजेक्शन्सच प्राप्त न झाल्याने म्युकरग्रस्तांच्या कुटुंबीयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

मागील आठवड्यापर्यंत रुग्णांना किमान एक इंजेक्शन मिळत होते. मात्र, आठवड्याच्या प्रारंभापासून अर्थात ३१ मे आणि १ जूनला एकही ॲम्फोटेरेसिन इंजेक्शन मिळू शकले नाही. बुधवारी पुन्हा इंजेक्शन न मिळाल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांचे आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपुरे पडू लागले आहेत. आठवडाभरापासून केवळ एक किंवा इंजेक्शनच नाही, अशी परिस्थिती रुग्णांवर येत असल्याने रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड चिंतेत टाकले आहे. तातडीने इंजेक्शन्सचा पुरेसा साठा न मिळाल्यास बहुतांश रुग्णांचा आजार बळावण्याची शक्यता आहे तसेच अनेक रुग्णांवर पुन्हा दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. त्यामुळे ताबडतोब ॲम्फोटेरेसिनचा पुरवठा करावा, यासाठी अनेक रुग्ण आणि कुटुंबीयांनी थेट आरोग्यमंत्र्यांपर्यंत त्यांचे गाऱ्हाणे मांडले आहे. राज्य शासनानेदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढून ॲम्फोटेरेसिनची साठ हजार इंजेक्शन्स मागवली असली तरी ती पोहोचण्यास अद्याप कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत रुग्णांचा आजार बळावणार असून रुग्णालयांच्या बिलांत होणाऱ्या दिवसागणिक वाढीने नागरिकांच्या समस्येत मोठीच भर पडत आहे.

इन्फो

म्युकरग्रस्तांचे कुटुंबीय हतबल

शुक्रवारीदेखील एकही ॲम्फोटेरेसिन इंजेक्शन प्राप्त झाले नसल्याने कुणाही म्युकरग्रस्त नागरिकाला इंजेक्शन मिळू शकले नाही. एकीकडे रुग्णांची स्थिती गंभीर होत असताना त्यांच्यासाठी कुठूनही ॲम्फोटेरेसिन इंजेक्शनच उपलब्ध होऊ शकत नसल्याने म्युकरग्रस्तांचे कुटुंबीय अक्षरश: हतबल झाले आहेत.

इन्फो

काहींचे पुन्हा ऑपरेशन तर काहींनी नेले घरी

म्युकरमायकोसिस झाल्याचे लक्षात येताच सर्वप्रथम ईएनटी किंवा डेंटिस्टकडून ऑपरेशन करून ती बुरशी काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करावे लागते. त्यानंतर दररोज ८ ते ९ ॲम्फोटेरेसिन इंजेक्शनचा डोस सातत्याने दिल्यासच त्या बुरशीचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो. म्युकरचा उद्भव झाल्यापासून एकही दिवस पुरेशी इंजेक्शन्स मिळाली नसल्याने अनेक रुग्णांवर पुन्हा ऑपरेशनची वेळ आली. ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे, त्यांचे पुन्हा ऑपरेशन होत आहे. ज्यांना पुन्हा ऑपरेशनचा खर्चच झेपेनासे आहेत, अशा म्युकरग्रस्तांच्या कुटुंबीयांच्या हाती तर दैवाला दोष देत घरी नेण्याच्या हतबलतेवाचून काहीच उरले नसल्याची भावना आहे.

Web Title: The rattle of amphotericin injection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.