‘आदिवासी बचाव’तर्फे रावण प्रतिमेची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:26 IST2018-10-19T00:26:04+5:302018-10-19T00:26:21+5:30
विजयादशमी (दसरा) निमित्ताने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान व जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने म्हसरूळ येथील कणसरा चौकात गुरुवारी दुपारी रावणाच्या प्रतिमेची मिरवणूक काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने रावण पूजनचा कार्यक्रम करण्यात आला.

‘आदिवासी बचाव’तर्फे रावण प्रतिमेची मिरवणूक
पंचवटी : विजयादशमी (दसरा) निमित्ताने महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान व जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने म्हसरूळ येथील कणसरा चौकात गुरुवारी दुपारी रावणाच्या प्रतिमेची मिरवणूक काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने रावण पूजनचा कार्यक्रम करण्यात आला.
दुपारी म्हसरूळ येथील कणसरा चौकातील पटांगणावर महिलांच्या हस्ते रावणाच्या प्रतिमेचे भरतीपूजन व रावण ताटी करण्यात आली. त्यानंतर समस्त आदिवासी बांधवांनी रावण ताटी तसेच पावरी नृत्याचे सादरीकरण करून संचलन केले. आदिवासी समाजात रावणाला राजा मानले जात असल्याने विजयादशमीच्या (दसरा) दिवशी रावणाचे पूजन करण्याची प्रथा आहे. यावेळी अशोक बागुल यांनी रावणाचे माहात्म्य सांगून रावणाचे पूजन का करावे याबाबतची माहिती विशद केली. आदिवासी समाजात रावणाला देव मानतात त्यामुळे रावणदहन थांबवावे, असा संदेश रावणपूजन करून देण्यात आला. महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री धरती माता आरती झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसन ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला मयूर बागुल, सुरेंद्र चौरे, किरण बहिरम, देवेन्द्र भरसट, गणेश पवार, नितीन गवळी, सारंग गावित यांच्यासह कणसरा माता मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.