‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST2021-06-29T04:11:55+5:302021-06-29T04:11:55+5:30
इगतपुरीचा परिसर मुंबईकरांनाही जवळ आहे. कसारा घाट चढून आल्यानंतर इगतपुरी वाटेत लागते. येथील स्काय ताज व्हीला, स्काय लगून व्हीला ...

‘हवाईयन थीम’वर तीन दिवस रंगणार होती रेव्ह पार्टी !
इगतपुरीचा परिसर मुंबईकरांनाही जवळ आहे. कसारा घाट चढून आल्यानंतर इगतपुरी वाटेत लागते. येथील स्काय ताज व्हीला, स्काय लगून व्हीला या दोन खासगी बंगल्यात संशयित पीयूष सेठीयाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तब्बल पाच दहा नव्हे तर एकूण १० पुरुष आण १२ महिला असे २२ जण एकत्र येऊन शुक्रवारपासून रेव्ह पार्टीत रंगले होते. ही 'रेव्ह पार्टी' साधीसुधी मुळीच नव्हती. हा सगळा बेत एका 'हवाईयन पार्टी'च्या धर्तीवर आखला गेला होता, असे पोलिसांनी सांगितले. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या पोशाखात पोलिसांचा लवाजमा घेत शनिवारी मध्यरात्री या बंगल्यावर छापा मारत हायप्रोफाईल पार्टी उधळून लावली. येथून २२ संशयितांना पोलिसांनी अटक करून अमली पदार्थ बाळगून त्याचे सेवन केल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रक्ताचे नमुनेही तपासण्यासाठी संकलित करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. २८) या २२ लोकांना न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
---इन्फो---
बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चर्चेत!
या सर्वांनी मिळून एका दिवसात महागड्या ब्रॅन्डची सुमारे सव्वा लाखाची दारू रिचविल्याचे बंगल्यांच्या परिसरात आढळून आलेल्या रिकाम्या बाटल्यांवरून पोलिसांनी निष्पन्न केले आहे. तसेच तेवढ्याच किमतीचा सीलबंद मद्यसाठा पोलिसांनी येथून जप्त केला आहे. ड्रग्ज, कोकेन, चरस, गांजा यांसारखे अमली पदार्थही पोलिसांच्या हाती लागल्याने बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
---इन्फो---
हिना पांचालचे मुख्य आकर्षण
‘हवाईन थीम’च्या धर्तीवर रंगलेल्या या रेव्ह पार्टीचे मुख्य आकर्षण बॉलिवूडची अभिनेत्री हिना पांचाल हेच होते. ड्रग्ज, कोकेन, गांजा, चरस सारख्या नॉर्कोटिक्स पदार्थांचे सर्रासपणे मोठ्या प्रमाणात सेवन केले जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ अमली पदार्थ शोधण्यात तरबेज असलेल्या श्वानाला पाचारण केले. हे दोन्ही बंगले पोलिसांनी श्वानाच्या मदतीने पिंजून काढले.
----इन्फो---
...अशी रंगली होती ‘हवाईयन रेव्ह पार्टी’
हवाईयन संकल्पनेनुसार सहभागी २२ नशेबाज मंडळींनी तीन दिवसांचा वेगवेगळा ड्रेस कोड निश्चित केला होता. रंगीबेरंगी फुलांचे अत्यंत तोकडे कपडे या १० पुरुष आणि १२ हायप्रोफाईल महिलांनी परिधान करत आगळीवेगळी वेशभूषा केली होती. दरम्यान, अमली पदार्थांचे सेवन करून निसर्गरम्य वातावरणात दुर्गंधीयुक्त धूर या नशेबाजांकडून सोडला जात असताना त्याची कुणकूण पोलिसांना लागली. पोलिसांनी छापा मारला असता या सगळ्यांची धावपळ उडाली.
---इन्फो--
....काय आहे हवाईयन पार्टी
‘हवाईयन’ अर्थात हवाई बेटांवरील संस्कृतीला साजेशा अशा संकल्पनेवर अधारित पार्टी. यास लुलु पार्टी असेसुद्धा म्हटले जाते. खूपच उघडपणाची वर्तणुकीसाठी ही शैली ओळखली जाते. विविध रंगीबेरंगी फुलांची डिझाईन असलेले कमी कपडे या पार्टीमध्ये घातले जातात. पाश्चात्त्य संस्कृतीशी या पार्टीचा संबंध येतो. हवाई नावाचे एक विशेष बेट आहे. जेथे अत्यंत उष्ण असे वातावरण आहे. त्यामुळे तेथे वास्तव्यास असलेले लोक कमी कपडे घालतात. ही पार्टी रंगविताना जागेचीदेखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने सजावट केली जाते.
---इन्फो--
‘हिना’च्या ॲटिट्यूडचा पोलिसांना संताप
पोलिसांनी साध्या वेशात जेव्हा बंगल्यांवर धाड टाकली तेव्हा बंगल्यांमधील उच्चभ्रू व्यक्तींनी हातात मोबाईल घेऊन वेगवेगळ्या लोकांचे नंबर फिरविले खरे; मात्र कोणाच्याही मोबाईलला रेंज मिळत नसल्याने सगळ्यांची कोंडी झाली. यावेळी पोलिसांनी तत्काळ सर्वांचे मोबाईल जप्त केले. या कारवाईदरम्यान हिना पांचाल हिच्या सेलिब्रिटी ॲटिट्यूडचा पोलिसांना यावेळी सामना करावा लागत होता. यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ‘खाकी’च्या शैलीत हिनाला दम भरल्यानंतर ती जमिनीवर आली आणि तपासकार्यात सहकार्य करू लागल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.