रवींद्र मिर्लेकर यांची उचलबांगडी, सेनेत खांदेपालट नाशिकला अजय चौधरी, तर दिंडोरीला सुहास सामंत नवीन संपर्कप्रमुख, शहर व जिल्'ातही लवकरच खांदेपालट
By admin | Published: February 20, 2015 01:17 AM2015-02-20T01:17:31+5:302015-02-20T01:17:58+5:30
रवींद्र मिर्लेकर यांची उचलबांगडी, सेनेत खांदेपालट नाशिकला अजय चौधरी, तर दिंडोरीला सुहास सामंत नवीन संपर्कप्रमुख, शहर व जिल्'ातही लवकरच खांदेपालट
नाशिक : भाजपाच्या आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याच्या हालचाली पाहता व नाशकात सेनेला आलेली मरगळ पाहता शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांची नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून उचलबांगडी करीत लोकसभानिहाय दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सुहास सामंत, तर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी वरळीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. लवकरच आता नाशिक महानगर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पदांवरही संक्रांत येण्याची चिन्हे असून, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजविण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच जुन्या पदाधिकाऱ्यांचीही नवीन पदाधिकाऱ्यांबरोबर सांगड घालण्यात येणार असल्याची चर्चा सेनेच्या वर्तुळात आहे. शिवसेनेने इतिहासात पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख या पदात बदल करून नाशिक जिल्'ात लोकसभानिहाय संपर्कप्रमुख नियुक्त केले आहेत. उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखाची जबाबदारी असलेल्या रवींद्र मिर्लेकर यांच्या खांद्यावर नाशिक वगळता धुळे, जळगाव व नंदुरबारची धुरा सोपविण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला कळवण, सटाणा, चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघांत सपाटून मार खावा लागला होता, तर नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे नाशिक मध्यमधून शिवसेनेचे उमेदवार असलेले महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांची तर अनामत रक्कमही जप्त झाली होती. तसेच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळण्याबरोबरच शिवसेनेला एकाच जागेवर समाधान मानावे लागले होते. निवडणुकीनंतर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा सल्ला देत शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याची चर्चा होती. त्यानंतर लगेचच दमण-गंगा नारपार योजनेच्या विरोधात विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यापुरते का होईना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. आता मात्र पक्षप्रमुखांनी सर्व बाबींचा बारीक विचार करूनच शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या नवीन संपर्क प्रमुखांची व तीही लोेकसभानिहाय नियुक्ती करून विद्यमान पदाधिकाऱ्यांना गर्भित इशारा दिल्याची चर्चा शिवसेनेच्याच एका गोटात आहे. आता लवकरच पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसारच महानगर व जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्येही खांदेपालट करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.(प्रतिनिधी)