मुसळगावच्या उपसरपंचपदी रवींद्र शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:34 PM2017-08-20T22:34:30+5:302017-08-21T00:23:32+5:30
सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या मुसळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र सूर्यभान शिंदे विजयी झाले. या चुरशीच्या निवडणुकीत शिंदे यांनी कृष्णा कचरू सिरसाट यांचा दोन मतांनी पराभव केला.
मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या मुसळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रवींद्र सूर्यभान शिंदे विजयी झाले. या चुरशीच्या निवडणुकीत शिंदे यांनी कृष्णा कचरू सिरसाट यांचा दोन मतांनी पराभव केला. शिवाजी सिरसाट यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच निवडीसाठी ५ आॅगस्ट रोजी सरपंच कमल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, विशेष सभेचे अध्यक्ष सरपंच जाधव अनुपस्थित राहिल्याने सदर बैठक रद्द झाली. त्यामुळे उपसरपंच निवडीसाठी पुन्हा बुधवारी (दि. १६) ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी रवींद्र शिंदे व कृष्णा सिरसाट या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत उभयतांपैकी कोणीही माघार न घेतल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सिरसाट, नंदू माळी, अर्चना माळी, अर्चना जोंधळे, सुरेखा सिरसाट, लताबाई नवले, बेबी लहांगे, गोविंद माळी, दत्तू ठोक, योगिता सिरसाट, सुनीता कदम, लता गांडोळे, अरुण बेदडे, ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ पाटील उपस्थित होते. शिंदे यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शिंदे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच रवींद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दामू शिंदे, वामन जोंधळे, माधव नवले, पोपट थोरात, सुरेश कुºहाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.