वाहनधारकांना लवकरच मिळणार आरसी बुक
By admin | Published: September 9, 2016 01:12 AM2016-09-09T01:12:11+5:302016-09-09T01:12:21+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय : एक लाख बुकचे प्रिंट
पंचवटी : स्मार्ट कार्ड बंद झाल्यानंतर नवीन ठेका न निघाल्याने वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या आरसी बुकचा तिढा वाढला होता; मात्र आता नवीन एक लाख आरसी बुकचे प्रिंट केल्याने वाहनधारकांना लवकरात लवकर आरसी बुकचे वाटप केले जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे.
वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत स्मार्ट कार्ड दिले जात होते. मात्र स्मार्ट कार्डचा ठेका संपल्याने नवीन ठेका निघाला नाही. त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा आरसी बुक दिले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून आरसी बुकचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांना आरसी बुकसाठी वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. दोन दिवसांपूर्वीच कळसकर यांनी स्वत:च शासनाच्या नियमानुसार नवीन एक लाख आरसी बुकचे प्रिंट केले आहे.
नवीन आरसी बुक प्रिंट केल्याने ज्या वाहनधारकांना आरसी बुक मिळाले नव्हते त्यांना लवकरात लवकर आरसी बुक वाटप केले जाणार असल्याचे कळसकर यांनी सांगितले. आरसी बुक मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून वाहनधारक तसेच एजंटांकडून वारंवार तक्रार केली जात होती. मात्र प्रिंटिंगअभावी कामे खोळंबली होती. (वार्ताहर)