अपात्रतेनंतर निवाणेच्या सरपंचपदासाठी पुन्हा मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:30 IST2018-08-28T16:29:59+5:302018-08-28T16:30:21+5:30
२६ सप्टेंबरला निवडणूक : अपत्यामुळे पदावरुन पायउतार

अपात्रतेनंतर निवाणेच्या सरपंचपदासाठी पुन्हा मतदान
कळवण - दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या तक्ररीनुसार निवाणे ग्रामपंचायतीचे सरपंच केदा शिवाजी सोनवणे यांचे सदस्यत्व रद्दबातल होत त्यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी आता पोटनिवडणूक लागली असून येत्या २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
सन २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत केदा शिवाजी सोनवणे ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांनी नामनिर्देशनपत्रात दोनच अपत्य असल्याची खोटी माहिती दिली होती. याबाबत राजेंद्र आहेर यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रर करून दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याचे पुरावे सादर केले होते. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडील सुनावणीत राजेंद्र आहेर यांच्या तक्ररीनुसार तीन अपत्य असल्याचे स्पष्ट झाल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनुसार दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याच्या कारणास्तव केदा सोनवणे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिका-यांनी दिला. त्यामुळे तत्कालीन सरपंच असलेल्या केदा शिवाजी सोनवणे यांचे सरपंचपद रद्द ठरविले होते. आता या पदासाठी थेट जनतेतून निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.
निवडणूक कार्यक्र म
रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी थेट जनतेतून निवडणूक होत आहे. यासाठी दि ५ ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ३ वाजता सार्वजनिक सुट्टी वगळता इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. दि १२ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपासून छाननी होणार आहे. दि १५ सप्टेंबर रोजी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. तसेच त्याच दिवशी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. दि २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० वाजेदरम्यान मतदान घेण्यात येणार असून दि २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी करण्यात येईल .