मतदार याद्यांचे पुन्हा अद्ययावतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:21 AM2018-05-14T00:21:49+5:302018-05-14T00:21:49+5:30
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अधिकाधिक बिनचूक व अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने दि. १५ ते २० मे या कालावधीत देशपातळीवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या मोहिमेंतर्गत बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची माहिती गोळा करणार आहेत.
नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अधिकाधिक बिनचूक व अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने दि. १५ ते २० मे या कालावधीत देशपातळीवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या मोहिमेंतर्गत बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची माहिती गोळा करणार आहेत. निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या शुद्धिकरणाचा उपक्रम बाराही महिने सुरू असला तरी, त्याला फक्त प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळातच मतदारांकडून प्रतिसाद मिळतो. परिणामी मतदानाच्या दिवशी मतदार याद्यांबाबत सर्वाधिक तक्रारी केल्या जातात. त्या टाळण्यासाठी एप्रिल महिन्यात निवडणूक आयोगाने मतदार यादीत ज्या मतदारांची छायाचित्रे नाहीत ती गोळा करण्याचे तसेच ज्यांचे यादीत कृष्णधवल छायाचित्र आहे त्यांच्याकडून रंगीत छायाचित्र गोळा करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु बीएलओ असलेल्या शिक्षकांनी शैक्षणिक परीक्षांचे कारण देत या कामात अनुत्साह दर्शविल्याने त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा एकदा हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, दि. १५ ते २० मे या काळात बीएलओंनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराचे मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री करावी, यादीतील नाव, पत्ता, वय, लिंग यााबाबत असलेल्या त्रुटी दूर करण्याबरोबरच १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.