वृक्षतोडीसाठी पुन्हा सरसावली कृती समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:41 PM2017-11-01T23:41:03+5:302017-11-02T00:15:57+5:30
गंगापूररोडवर जेहान सर्कल ते गंगापूर गावाच्या डीपीरोडच्या विस्तारीकरणात बाधीत होत असलेली झाडे महापालिकेने हटवावीत, तसेच भोसला स्कूलच्या बाजूने असलेल्या जागेचे भूसंपादन करून रुंदीकरण पूर्ण करावे, अशी मागणी गंगापूर रस्ता विकास कृती समितीने केली आहे.
नाशिक : गंगापूररोडवर जेहान सर्कल ते गंगापूर गावाच्या डीपीरोडच्या विस्तारीकरणात बाधीत होत असलेली झाडे महापालिकेने हटवावीत, तसेच भोसला स्कूलच्या बाजूने असलेल्या जागेचे भूसंपादन करून रुंदीकरण पूर्ण करावे, अशी मागणी गंगापूर रस्ता विकास कृती समितीने केली आहे. गंगापूररोडवर जेहान सर्कल ते गंगापूर गावापर्यंतच्या रस्त्यावरील वृक्षतोडीचा विषय प्रचंड गाजला होता. वृक्षतोडीच्या विरोधात उच्च न्यायालयात प्रकरण असल्याने त्यावरून बरीच भवतीनभवती झाली होती. अखेरीस न्यायालयाने अटी-शर्तींच्या आधारे हा विषय मार्गी लागला आणि काही झाडे तोडण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार काही प्रमाणात झाडे तोडून काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी न्यायालयाच्या अटीनुसार महापालिकेने दहा झाडे लावली आहेत. तथापि, याच शंभर मीटर डीपीवरील बाधीत झाडे तोडण्याचे बाकी आहे. त्यामुळे ही झाडे त्वरित हटवावीत, अशी मागणी समितीने केली आहे. विशेषत: भोसला स्कूल गेटसमोर, नवश्या गणपतीरोड म्हणजेच वागस्कर बंगल्याजवळ, पोतदार हाउस कंपाउंड, गणेश मार्बलजवळ अशा विविध ठिकाणी असलेले वृक्ष तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याबरोबर जेहान सर्कल ते श्री गुरुजी रुग्णालयाच्या दरम्यान शंभर मीटर डीपीरोडलगत दक्षिण बाजूला भोसला स्कूल आहे. त्याच्या आत महापालिकेने सीमांकन केले आहे. सदरची जागा संपादित करून रस्ता रुंदीकरण करावे तसेच गंगापूरराडवर कॉलेजरोड, गंगापूररोड, मॉडेल कॉलनी, भोसला मिलिटरी स्कूल या दरम्यानचा विकास आराखड्यात दर्शविलेला रस्ता तयार करावा, आनंदवली पाइपलाइनरोड, नक्षत्र लॉन्स पुढील डीपीरोड विस्डम हाय ते सिरीन मेडोजपर्यंत पूर्ण करावा, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. समितीचे के. जी. मोरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी ही मागणी केली असून, यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांना जनता दरबारात निवेदनही दिले जाणार आहे.