पुतळे उभारण्यापेक्षा वाचनसंस्कृती जोपासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:32 AM2017-09-24T00:32:18+5:302017-09-24T00:32:23+5:30
भारतातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी समाजासाठी योगदान देऊन आदर्श समाजाचा पाया रोवला आहे. अशा महापुरुषांना साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर उभे करण्यासाठी देशात वाचन संस्कृती जोपासली तर मोठ्या प्रमाणात खर्च करून पुतळे उभारण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांनी केले आहे. साहित्यगंगेच्या प्रवाहातील दररोज डुबणारा वाचक एवढाच आपला साहित्याशी संबंध असल्याचे सांगतानाच एकसंघ समाजनिर्मितीची जबाबदारी असलेल्या साहित्यातील सारस्वतांच्या मतभेदामुळे मन सुन्न होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नाशिक : भारतातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी समाजासाठी योगदान देऊन आदर्श समाजाचा पाया रोवला आहे. अशा महापुरुषांना साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर उभे करण्यासाठी देशात वाचन संस्कृती जोपासली तर मोठ्या प्रमाणात खर्च करून पुतळे उभारण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांनी केले आहे. साहित्यगंगेच्या प्रवाहातील दररोज डुबणारा वाचक एवढाच आपला साहित्याशी संबंध असल्याचे सांगतानाच एकसंघ समाजनिर्मितीची जबाबदारी असलेल्या साहित्यातील सारस्वतांच्या मतभेदामुळे मन सुन्न होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.२३) दिमाखदार सोहळ्यात सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील, कवी संमेलनाच्या अध्यक्ष रेखा भांडारे, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, खासदार हेमंत गोडसे, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते आदि उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले, समाज एकसंघ राखण्यात साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्यिकांनी मतभेद विसरून एकसंघ समाजनिर्मितीसाठी निर्भिडपणे लेखन केले पाहिजे. परंतु, आजकालच्या साहित्य संमेलनांमध्ये या मतभेदांमुळेच सरस्वतीची जागा लक्ष्मीने घेतल्याचे सांगत साहित्य संमेलनांमधील शाही बजेटविषयी त्यांनी बोचरी टीका केली. साहित्य आणि साहित्याच्या सन्मानासाठी अशा प्रकारचे जिल्हास्तरीय मेळावे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. सोशल माध्यमांच्या काळात उन्मादी घटक जन्माला येत असताना साहित्यिकांसमोर समाजातील जातीभेदाच्या भिंती जमीनदोस्त करण्याची जबाबदारी आहे. तसेच शेतकºयांमध्येही प्रादेशिक वादाने जन्म घेण्याची भीती निर्माण होत असताना विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांना एकसंघ ठेवण्याची शक्ती साहित्यात असल्याचे सांगतानाच क वी विठ्ठल वाघ यांनी त्यांच्या साहित्यातून शेती आणि शेतकºयांच्या मांडलेल्या वेदना साºया महाराष्ट्रात सारख्याच असल्याचे अनासपुरे यांनी सांगितले. प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक करताना सावानाकडून सुरू असलेल्या विविध उपक्रमांसह आगामी काळातील नियोजनाचीही माहिती दिली. प्राचार्य वेदश्री थिगळे व कवी किशोर पाठक यांनी सूत्रसंचालन करताना ऐतिहासिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या आठवणी जागवल्या, तर सहायक सचिव अॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले.
कविता हे अभिव्यक्त होण्याचे साधन
कविता ही प्रत्येक भाषेच्या साहित्यिकासाठी व्यक्त तथा अभिव्यक्त होण्याचे साधन असून, कवितेत समाजमन परिवर्तनाचे सामर्थ्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील कविसंमेलन अध्यश्र रेखा भांडारे यांनी व्यक्त केले. कवि संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात मेळाव्याच्या रंगलेल्या कविसंमेलनात कवी अरुण इंगळे यांनी सादर केलेली ’तू होता बापा म्हणून’ कवितेने भरभरून दाद मिळवली. त्याचप्रमाणे चेतन पणेर यांची वर्क इज वर्कशीप, दत्रात्रय दाणी यांची ‘माणूस कसा असावा’ आणि राम पाठक यांची ‘प्रकाशाला नसते पाठ’ या कवितेसह विजय वराडे, चंद्रकांत ठासे आदि कवींनी सादर केलेल्या कवितांनाही रसिकांची पसंती मिळाली.