बालरोग तज्ज्ञांसह जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची सज्जता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:53+5:302021-05-28T04:11:53+5:30
नाशिक : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ आणि मध्यमवयीन तर दुसऱ्या लाटेत मध्यमवयीन आणि युवकांच्या बाधित होण्याचा तसेच मृत्यूचा दरदेखील ...
नाशिक : कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ आणि मध्यमवयीन तर दुसऱ्या लाटेत मध्यमवयीन आणि युवकांच्या बाधित होण्याचा तसेच मृत्यूचा दरदेखील अधिक होता. तसेच अद्याप मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ तर दूरच त्याबाबतच्या चाचण्यादेखील पूर्ण झालेल्या नसल्याने प्रस्तावित तिसरी लाट ही युवक आणि बालकांसाठी घातक ठरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, त्या लाटेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाची सज्जता करण्यात येत असून जिल्हा रुग्णालयातील २ नवजात शिशु तज्ज्ञांची पदे वगळता अन्य सर्व पदेदेखील भरण्यात आली आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम बालकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी मुळात बालकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने तिसरी लाट आली तरी तिचा फार मोठा परिणाम बालकांवर होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, तिसरी लाट येईपर्यंत बालकांचे लसीकरण पूर्ण होण्याची शक्यताच नसल्याने बालकांची विशेष काळजी घ्यावी लागणार असून त्यासाठीच्या खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याशिवाय नाशिक मनपाच्या वतीने बालकांसाठी दोन १०० खाटांची रुग्णालयेदेखील उभारण्यात येत आहेत.
बाल रुग्णालयांमध्ये सहाशे बेड्स
नाशिक शहरातील ४१ खासगी रुग्णालयांमध्ये बालकांसाठीच्या सहाशे बेड्सची व्यवस्था आहे. त्यापैकी सुमारे ४०० हून अधिक बेड्सना ऑक्सिजनची व्यवस्था असून आवश्यकता भासल्यास त्यातदेखील वाढ करता येणार आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येदेखील सर्व प्रकारची सज्जता ठेवण्यात आली आहे.
बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स
कोरोनाची लागण युवकांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दुसऱ्या लाटेपासूनच निदर्शनास येत आहे. त्यात तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेचीदेखील पूर्वसूचना आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेषकरून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने गठित करण्यात आला आहे.
इन्फो
उपजिल्हा रुग्णालयांमध्येही स्वतंत्र व्यवस्था
केवळ बालकांसाठी नवीन रुग्णालये, कोविड सेंटर्स, बेडची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेड्स यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये २५ तर काही अन्य केंद्रांमध्ये ५० स्वतंत्र खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.
इन्फो
शासकीय रुग्णालयांमध्ये तयारीला वेग
जिल्हा शासकीय रुग्णालयात ९ बालरोग तज्ज्ञ असून १ नवजात शिशुतज्ज्ञाच्या पदाची भरतीदेखील करण्यात आली आहे. अन्य दोन नवजात शिशुतज्ज्ञांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले असून त्या जागादेखील भरल्या जाणार आहेत. त्याशिवाय उपजिल्हा रुग्णालयांसह अन्यत्र १६ बालरोगतज्ज्ञ कार्यरत असून सर्व प्रकारच्या सज्जतेला वेग देण्यात आला आहे.
डॉ. पंकज गाजरे, बालरोग विभागप्रमुख, जिल्हा रुग्णालय