दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्यासाठी सज्ज : माथूर

By admin | Published: October 5, 2016 11:21 PM2016-10-05T23:21:27+5:302016-10-05T23:41:34+5:30

दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्यासाठी सज्ज : माथूर

Ready to fight terrorist attacks: Mathur | दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्यासाठी सज्ज : माथूर

दहशतवादी हल्ल्याच्या मुकाबल्यासाठी सज्ज : माथूर

Next

नाशिक : उरी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ‘सर्जिकल स्ट्राईक्स’द्वारे दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले़ त्यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची भीती गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे़ या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दल सज्ज असून, सागरी सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे़
तसेच फोर्स वन, एटीएस, एटीसी, क्यूआरटी व आरसीपी जवान राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली़ महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ११४ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ राज्याच्या सीमा सुरक्षिततेच्या मुद्द्यावर माथूर यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार व पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षिततेबाबत गंभीर आहे़ मुंबईमधील सागरी सुरक्षिततेसाठी पोलीस दलास ७० नवीन बोटी मिळाल्या असून, याठिकाणी फोर्स वनचे कमांडो तैनात आहेत़ तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी क्यूआरटी, आरसीएफ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत़ या तिन्ही विभागातील जवानांकडे अत्याधुनिक शस्त्रे असून सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली आणखी काही शस्त्रे व साहित्य विकत घेण्याची प्रक्रि या येत्या एक-दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे़
मुंबईतील सागरी तळांच्या सुरक्षिततेसाठी चार नवीन सागरी पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे़ एनएसजी, बीएसएफ व गुप्तचर यंत्रणांसोबत नियमित बैठका सुरू असून, चांगला समन्वय साधला जात आहे़ राज्यांतर्गत सुरक्षेसाठी विभागीय बैठका तर सीमा व सागरी सुरक्षेबाबत आठ दिवसांपूर्वीच अहमदाबाद येथे राज्यस्तरीय बैठक झाली होती़ राज्यातील दहशतवादी कारवाई वा हालचालींवर नजर ठेवण्यासाठी दहशतवादविरोधी पथक तसेच पोलीस ठाणे स्तरावर असलेल्या एटीसी विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़ पोलिसांच्या नेटवर्किंगमध्ये चांगलीच सुधारणा झाली असून सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सतर्क असल्याचे माथूर यांनी सांगितले़

पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दरवर्षी तपासणी
पोलिसांवरील कामाचा वाढता ताण त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्याची समस्या कमी व्हाव्यात यासाठी दरवर्षी पोलिसांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे़ तसेच आजारपणातील तपासणी अहवालाचे जतन केले जाईल़ कामावरील ताण कमी करण्यासाठी वर्षभरातून एकदा सहकुटुंब सहलीसाठी सुटी दिली जाईल़ या सुटीसाठीचा खर्च पूर्वी पोलीस कुटुंब कल्याण मंडळातर्फे केला जात होता तो आता सरकारने करावा, अशी मागणी केली जाणार आहे़ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंब सहलींसाठी औरंगाबाद, पुण्यासह विविध ठिकाणावरील ‘हॉलिडे होम’ येत्या जानेवारीपासून सुरू होणार आहेत़

 

Web Title: Ready to fight terrorist attacks: Mathur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.