संत ज्ञानेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:20 AM2019-11-18T01:20:52+5:302019-11-18T01:21:18+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने रविवारी जुने नाशिकमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. यावेळी भक्त परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले.
नाशिक : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने रविवारी जुने नाशिकमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. यावेळी भक्त परिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हुंडीवाला लेनमधील मंदिरात रविवारी सकाळी गोंदवलेकर महाराज परिवाराच्या वतीने काकड आरती करण्यात आली. अत्यंत तालासुरात झालेल्या माउलींच्या आरतीने आणि पुंडलीक वरदा हारी विठ्ठलच्या गजराने रविवारी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. गोंदवलेकर महाराज भक्तपरिवारातील ३००हून अधिक अनुयायी या काकड आरतीप्रसंगी उपस्थित होते. सकाळच्या काकड आरती सोहळ्यापासून सुरू झालेली भाविकांची रीघ रात्रीपर्यंत अखंड सुरू होती.
तसेच दि. २५ तारखेपर्यंत बीडच्या अनिताताई चिंचपूरकर यांचे संतचरित्र या विषयावरील कीर्तन रंगत आहे. त्याशिवाय अमृतानुभव पारायण, दशास्कंद भागवत पारायण अर्चना शुक्ल आणि शीला लोंढे यांनी केले. त्याशिवाय शुक्रवारी दासबोध भजनी मंडळाच्या अध्यक्ष जयश्री गुरव आणि सहकाऱ्यांची भजने, शनिवारी रुक्मिणी भजनी मंडळाच्या तुपसाखरे आणि सहकाऱ्यांची तसेच स्वामीनारायण भजनी मंडळाच्या प्रज्ञा गोडसे आणि सहकाºयांची भजने झाली. रविवारी कल्याणी भजनी मंडळाच्या लता जाखडी आणि सहकाºयांची भजने रंगली, तर शुक्रवारी सुवर्णा महाबळ यांचे संतांचा संग हाची स्वर्गवास, शनिवारी सुलभा सायगावकर यांचा हरिपाठाचा अभंग रंगला.
त्याशिवाय रविवारी दिंडी सोहळा, समाधी अभंग, आरती आणि महाप्रसाद, गीता पाठ असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले, तर सायंकाळी रसिका जोशी-भिडे आणि भक्ती नांदुर्डीकर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. दरम्यान, सोमवारी सकाळी ९.३० वाजता कैलास महाराज वेलजाळी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ
संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी देवता पूजन आणि पुण्याह वाचन तसेच ज्ञानेश्वरी पारायण आणि महिलांचे भजन असा सोहळा पार पडला.