पोलीस खरा मित्र...
By किरण अग्रवाल | Published: March 11, 2018 01:51 AM2018-03-11T01:51:21+5:302018-03-11T01:51:21+5:30
पोलिसांची दहशतच असायला हवी हे खरेच, कारण त्याखेरीज गुन्हेगारी प्रकार करू धजावणाºया प्रवृत्तींना धाक वाटत नाही व त्यांना आळा बसत नाही. परंतु तशी दहशत निर्माण करतानाच काही बाबतीत पोलिसांमधील माणुसकीचाही प्रत्यय जेव्हा येऊन जातो तेव्हा पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना बळकट होण्यास मदत घडून येते. तुटलेले संसार पुन्हा जुळवून आणण्याच्या संदर्भात नाशिक पोलिसांनी केलेले कार्य असेच दखलपात्र ठरणारे आहे.
पोलिसांची दहशतच असायला हवी हे खरेच, कारण त्याखेरीज गुन्हेगारी प्रकार करू धजावणाºया प्रवृत्तींना धाक वाटत नाही व त्यांना आळा बसत नाही. परंतु तशी दहशत निर्माण करतानाच काही बाबतीत पोलिसांमधील माणुसकीचाही प्रत्यय जेव्हा येऊन जातो तेव्हा पोलीस जनतेचा मित्र असल्याची भावना बळकट होण्यास मदत घडून येते. तुटलेले संसार पुन्हा जुळवून आणण्याच्या संदर्भात नाशिक पोलिसांनी केलेले कार्य असेच दखलपात्र ठरणारे आहे. एकापाठोपाठ एक सुरू झालेल्या खूनसत्रांमुळे नाशकातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत मध्यंतरी शंकाच घेतली जात होती. परंतु अशा प्रकरणातील म्होरक्यांच्या मुसक्या आवळून त्यांना त्यांच्याच परिसरातून मिरवण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यानंतर गावगुंडांच्या दहशतीवर काहीसा परिणाम झाला आहे. छापेमारी करूनही जुगार अड्डे सुरूच असल्याची व किरकोळ कारणातून सार्वजनिक ठिकाणच्या वाहनांची नासधूस करण्यासारखे प्रकार मात्र सुरूच आहेत हा भाग वेगळा. परंतु त्याही बाबतीत पोलिसांकडून कसोशीने प्रयत्न केले जाताना दिसून येत आहेत. हे नित्यनैमित्तिक काम करतानाच नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी सामाजिक जागृतीच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापर, वाहनांचे भोंगे अनावश्यकरीत्या न वाजविण्यासारख्या व महिलांची सुरक्षितता तसेच सायबर क्राइमसाठी जनजागृतीपर ज्या काही मोहिमा सुरू केल्या आहेत त्यातून खाकी वर्दीतील पोलिसांचा सामाजिक चेहराही पुढे येऊन गेला आहे. यातील काही मोहिमा सुरू करताना खूपच चांगला प्रतिसाद लाभला असला तरी नंतर तो काहीसा थंडावलाही. परंतु नागरिकांमध्ये आपल्या जबाबदारीच्या जाणिवा जागृत करण्यात त्या नक्कीच उपयोगी ठरल्या. याखेरीज सिंगल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पुन्हा घरी’ या उपक्रमाने मात्र पोलिसांमधील माणुसकीचा वेगळाच अनुभव आणून दिल्याचे म्हणावे लागेल. कौटुंबिक वादातून पोलीस ठाण्याची पायरी चढणाºया व कोर्ट-कचेºयात अडकून वेळ वाया घालवणाºया पती-पत्नीचे महिला सुरक्षा विभाग व अभियोग कक्षाच्या सदस्यांद्वारे समुपदेशन करून या उपक्रमांतर्गत तब्बल १३६ कुटुंबांना विभक्त होण्यापासून परावृत्त केले गेले आहे ही खूप मोठी बाब आहे. संसाराचा गाडा ओढताना काहीसा खडखडाट होतच असतो. त्यातून मतभिन्नता वाढीस लागून नाते तुटण्यावर येऊन ठेपते. अशा नाजूक वळणावर संबंधिताना मानसिक आधार देत गैरसमज दूर करण्याची भूमिका या उपक्रमाद्वारे घेतली जाते. त्यामुळेच बहुसंख्य कुटुंबे पुन्हा सुखाने नांदू लागली आहेत. पोलीस आयुक्त सिंगल यांनी राबविलेल्या विविध समाजोपयोगी प्रकल्पांतर्गत सदरचा ‘पुन्हा घरी’ उपक्रम हा समस्या बाधितांना निव्वळ पोलिसी कारवाईपासून परावृत्त करणाराच नसून शासनाच्याही अपेक्षेनुसार सामाजिक व कौटुंबिक कलहापासून मुक्ती मिळवून देणाराच ठरला आहे.