रेमडेसीवीर शिफारसपत्राचे ‘रिॲलिटी चेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:15+5:302021-04-08T04:15:15+5:30
नाशिक : जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने रेमडेसीवीरची देखील मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे मेडिकल दुकानांवर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी दोन ...
नाशिक : जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने रेमडेसीवीरची देखील मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे मेडिकल दुकानांवर कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी दोन दिवसांपासून गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘रिॲलिटी चेक’ करीत नाातेवाईकांकडील शिफारस पत्राची पाहणी केली असता अनेक रुग्णालयांनी आपल्याकडील साठ्याची माहिती न देता नातेवाईकांना रेमडेसीवीर शिफारसपत्रे दिली असल्याचे आढळून आले.
या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या रुग्णालयतील कोरोना रुग्णांसाठी हे इंजेक्शन हवे आहे, त्या रुग्णालयाने आपल्याकडील रेमडेसीवीरचा साठा संपल्यानंतर त्यांचे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी विहित नमुन्यात शिफारसपत्र दिल्यानंतर या औषधाचे वितरण करण्याबातचे आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी मांढरे यांनी रेमडेसीवीरसाठी शहरातील औषधी दुकांनावर होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी बुधवारी भेट दिली व रांगेतील ग्राहकांशी चर्चाही केली. रुग्णालयाच्या शिफारस पत्राच्या मूळ प्रती संबंधित औषध विक्रेत्यांनी जतन करून ठेवणे तसेच तपासणीच्यावेळी तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे. संबंधित रुग्णाचे आधारकार्ड किंवा फोटो असलेला पुरावा तसेच शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले अन्य कागदपत्रे उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.
औषध विक्रेत्यांनी संबंधित प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे स्कॅन करून ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्यपद्धतीमुळे रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसीवीर अग्रक्रमाने उपलब्ध होईल व अनावश्यक खरेदी करण्यास आळा बसेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.