पत्नीचा अधिक पगार ठरतोय ‘गृहकलहाचे’ कारण
By संदीप भालेराव | Published: March 17, 2019 01:02 AM2019-03-17T01:02:10+5:302019-03-17T01:03:25+5:30
सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.
नाशिक : सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.
गृहकलह प्रत्येक घरात होत असतोच. आताचा काळही त्याला अपवाद नाही.
संसारात काही कुरबुरी असल्या तरी फार मोठे काही घडल्याशिवाय भांडणे चार भिंंतीच्या बाहेर येत नव्हती. आधुनिक काळात तर भांडणाची अचंबित करणारी कारणेही समोर आली आहेत. संसार करीत असताना समज-गैरसमजावरून होणारे वाद इथपर्यंत समजण्यासारखे आहे. परंतु प्रेमात पडल्यानंतर अल्पावधीच लग्नगाठ बांधणाऱ्या कॉलेज तरुण-तरुणींमध्ये आपसातील ‘इगो’ संसार मोडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे कौटुंबिक सल्ला केंद्राकडे येणाऱ्या तक्रारीवरून दिसून आले आहे.
महाविद्यालयात शिकत असताना मुले-मुली प्रेमात पडतात आणि काहीकाळानंतर लग्नगाठही बांधतात. शिक्षणात मुली आघाडीवर असल्याने शक्यतो मुलगी अधिक शिकलेली तर मुलाचे शिक्षण त्यामानाने कमी असते. प्रेमविवाह असल्याने शक्यतो विभक्त आणि प्रकरणात एकत्र कुटुंबात त्यांचा संसार सुरू होतो. अशावेळी दोघेही नोकरी पत्करतात. शिक्षनानुसार पत्नीला असलेला जास्त पगार आणि पतीला कमी पगार हा कालांतराने गृहकलहाला कारणीभूत ठरतो आणि त्यातून संसारात वाद सुरू होतात.
नाशिक शहरात अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाणे २५ ते ३० टक्के असल्याचा दावा नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समिती संचलित कौटुंबिक सल्ला केंद्राने केला आहे. तक्रारी दोन्ही पक्षाकडून केल्या जातात. पती अपेक्षित कमावत नसल्याची पत्नीची तक्रार असते तर पत्नी पगाराच्या जोरावर घरात वर्चस्व निर्माण करीत असल्याची पतीची तक्रार असते. अशा प्रकारच्या महिन्यात दहा तरी तक्रारी दाखल होत आहेत.
अलीकडच्या काळात प्रेम करताना कोणतीही बाब त्यांचा व्यर्ज नसते. लग्नानंतर मात्र ‘आटे डाल का भाव’ त्यांना माहिती होतो. अशा केसेस अत्यंत नाजूकपणे हाताळण्याची आवश्यकता असल्याने अशा प्रकारच्या दरमहा किमान दहा तरी कसेस सोडवाव्या लागतात. त्यांचे समुपदेशन करावे लागते. तडजोडीनंतर संबंधित कुटुंबाला अचानक भेट देऊन कुटुंबातील खुशाली पाहण्याची जबाबरी महिला हक्क बजावत असून ‘इगो’ असलेल्या महिलेला आणि पुरुषालाही समजावून सांगणे कठीण होऊन बसते. त्यामुळे हा तिढा अत्यंत कौशल्यतेने सोडवावा लागतो.