मुक्त विद्यापीठातही वेळूकर वादग्रस्तच
By Admin | Published: February 20, 2015 01:18 AM2015-02-20T01:18:58+5:302015-02-20T01:19:38+5:30
मुक्त विद्यापीठातही वेळूकर वादग्रस्तच
नाशिक : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यापासून पात्रतेच्या मुद्यावरून वादग्रस्त ठरलेले राजन वेळूकर यांना अखेर पदावरून दूर व्हावे लागले आहे. मुक्त विद्यापीठात कुलगुरू असतानाही त्यांच्या पात्रतेचा मुद्दा उपस्थित झाला होता, परंतू राजभवनापर्यंत तक्रारी करण्यापर्यंतच हे प्रकरण मर्यादित राहिल्याने वेळूकर मुक्त विद्यापीठात पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करू शकले. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राहण्यास राजन वेळूकर हे पात्र नसल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यपालांनी थेट त्यांची उचलबांगडी केली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्यापासून म्हणजेच २०१० पासून त्यांच्या पात्रतेचा मुद्दा गाजत होता. चौकशी समिती आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर आलेल्या निकालानंतर अखेर त्यांना पदावरून दूर करण्यात आले. कुलगुरू पदाचे अन्य एक उमेदवार आणि माजी कुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी वेळूकर यांच्या पात्रतेचा मुद्दा उपस्थित करीत न्यायालयात त्यांच्या नियुक्तीला आव्हान दिले होते. अशीच काहीशी परिस्थिती नाशिकमधील मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर नियुक्ती झाल्यावरही उद्भवली होती. २१ सप्टेंबर २००४ रोजी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियक्ती झाल्यानंतर वेळूकर हे या पदासाठी पात्र नसल्याच्या तक्रारी राजभवनापर्यंत पोहचल्या होत्या. कुलगरूपदाच्या उमेदवाराचे पाच शोधनिबंध प्रकाशित होणे अपेक्षित असतानाही त्यांचे केवळ चारच शोधनिबंध प्रकाशित झाल्याचा दावा काहींनी तक्रारीत केला होता. या तक्रारी राजभवनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पदावर रूजू होण्यापूर्वीच वेळूकर पात्रतेच्या मुद्यावरून चर्चेत आले होते. विशेष म्हणजे नियुक्तीनंतर वेळूकर यांनी तब्बल दोन महिने उशिरा पदभार स्वीकारल्याने त्यांच्या पात्र-अपात्रतेविषयीच्या अनेक चर्चांना उधाण आले होते, परंतु त्यांच्या पात्रतेविषयीचा आक्षेप केवळ तक्रारीपुरताच राहिल्याने तसेच तक्रारकर्त्यांनी थेट त्यांना आव्हान न दिल्यामुळे प्रकरण येथेच संपले. परंतु वेळूकरांनी दोन महिने उशिराने पदभार स्वीकारण्यामागे अनेक तर्कवितर्क लढविले गेले.