बंडखोरांना कपबशी
By admin | Published: February 14, 2017 12:39 AM2017-02-14T00:39:15+5:302017-02-14T00:39:34+5:30
बंडखोरांना कपबशी
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपा यांना बंडखोरीने ग्रासल्याचे चित्र आहे. यातही विचित्र योगायोग म्हणजे शिवसेनेच्या जिल्ह्यातील बहुतांश बंडखोरांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे धनुष्यबाणाचे वादळ चहाच्या ‘कपात’ शमते की बंडखोरांच्या कपबशीचा धनुष्यबाण वेध घेतो, याबाबत शिवसेनेच्या वर्तुळात चर्चा आहे.
पळसे गटातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून उपजिल्हाप्रमुख जगन आगळे असून, त्यांच्या विरोधात बंडखोर संजय तुंगार यांना तसेच एकलहरे गटातून खासदार पुत्र अजिंक्य गोडसे यांच्या समोर बंडखोर उमेदवार शंकर धनवटे यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. चांदोरी गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संदीप टर्ले यांच्या समोर बंडखोर उमेदवार लीलावती उत्तम गडाख यांना तसेच कसबे सुकेणे गटातून नागरी आघाडीचे उमेदवार रमेश जाधव यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे.
नांदगाव तालुक्यातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विजया अहेर यांच्या विरोधात शिवसेनेच्याच बंडखोर उमेदवार गायत्री शशिकांत मोरे यांनाही हेच चिन्ह मिळाले आहे. भाजपाचे उगाव गटातील अधिकृत उमेदवार संदीप तासकर यांच्या विरोधात भाजपाचे बंडखोर उमेदवार बबनराव सानप यांना छताचा पंखा, तर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब क्षीरसागर यांच्या समोर बंडखोर राजेंद्र डोखळे यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. देवगाव गटातील राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार अमृता पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच बंडखोर माजी जिल्हा प्रिषद सदस्य भाऊसाहेब भवर यांनी अपक्ष उमेदवारी केली असून, त्यांनाही कपबशी हेच चिन्ह मिळाले आहे. तिकडे माजी अध्यक्ष जयश्री पवार व सुभाष राऊत यांनी अभोणा गटातून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून माघार घेतली असून, तेथे कॉँग्रेसला पुढे चाल दिल्याची चर्चा आहे. त्र्यंबकमधून चुलत सुनेला चाल देण्यासाठी सासू पुष्पा झोले यांनी अलका झोले यांच्यासाठी माघार घेतली आहे. जायखेडा गटातून भाजपाचे अधिकृत उमेदवार चिंतामण पाटील यांच्यासमोर नवलसिंग खैरनार यांनी बंडखोरी केली आहे. तर पठावे दिगर घटातून गणेश अहिरे व मन्साराम पवार यांनी पक्षीय चिन्ह टाळून अपक्ष उमेदवारी केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)