विद्रोही साहित्य संमेलनदेखील रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:09+5:302021-03-08T04:15:09+5:30
नाशिक : नाशिकमध्ये केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ व २६ मार्चला आयोजित करण्यात आलेले १५ वे विद्रोही मराठी साहित्य ...
नाशिक : नाशिकमध्ये केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ व २६ मार्चला आयोजित करण्यात आलेले १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनदेखील रद्द करण्यात आले आहे. ज्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल, त्याच दिवसांमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णयदेखील रविवारी (दि.७) बैठकीत घेण्यात आला.
राज्यात कोरोना महामारीच्या वाढत्या संकटाचा गंभीरपणे विचार करून विद्रोहीच्या राज्य कार्यकारिणीने नाशिक येथे संयोजन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चर्चा केली. दरम्यान, कोरोनाचे नियम पाळून संयोजन समितीच्या बैठका, पूर्वतयारी सुरूच ठेवण्यात येणार असले तरी संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला.
विद्रोही संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचा विचार करून संविधानसन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, कार्यकारी संघटक किशोर ढमाले, अर्जुन बागुल नाशिक संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उनव्हणे, मुख्य संयोजक राजू देसले यांनी संयुक्तपणे जाहीर केले. रविवारच्या बैठकीस मुख्य निमंत्रक डॉ. इंदिरा आठवले, कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, मुख्य विश्वस्त ॲड. मनीष बस्ते, गणेश उन्हवणे, गुलामभाई शेख, व्ही. टी. जाधव, राकेश वानखेडे, शिवदास म्हसदे, यशवंत बागुल, प्रा. महेंद्र पवार, अरुण शेजवळ, अनिल आठवले, अजमल खान, किसन खिलारे, दादाजी बागुल, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शशांक हिरे, विजया दुधवले, राजेंद्र जाधव, राज निकाळे उपस्थित होते.
इन्फो
एकसमान तारखा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखांनाच १५ वे विद्रोही संमेलन आयोजित करण्याचेही निश्चित करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत त्याच संमेलनाच्या तारखांवर संमेलन घेतले जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे. दरम्यान, विद्रोहीचे अध्यक्ष, ठिकाण, प्रमुख पाहुणे तेच राहणार असल्यचेही कळविण्यात आले आहे.