मविप्रच्या मैदानात भरणार विद्रोही साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:21 AM2021-02-26T04:21:24+5:302021-02-26T04:21:24+5:30
नाशिक : संविधान सन्मानार्थ आयोजित १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे स्थळ अखेर निश्चित झाले असून मविप्रच्या मैदानावर हे ...
नाशिक : संविधान सन्मानार्थ आयोजित १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे स्थळ अखेर निश्चित झाले असून मविप्रच्या मैदानावर हे संमलेन होणार असल्याची माहिती संयोजन समितीतर्फे गुरुवारी (दि.२५) देण्यात आली आहे. मविप्र संस्थेतर्फे संमेलनासाठी मैदान देण्यात आले असले तरी शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करूनच समेलनाचे आयोजन करण्याची अट संस्थेने घातली आहे.
विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य विश्वस्त ॲड. मनीष बस्ते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १२) मविप्र संस्थेस संमेलन स्थळासाठी पत्र देण्यात आले होते. त्यास मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी संमती देणारे पत्र दिल्याने आता छत्रपती शाहू महाराज व सत्यशोधक चळवळीचा वारसा असलेल्या संस्थेच्या प्रांगणात संमेलन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या विद्रोही संमेलनासाठी संस्थेच्या मुख्य आवारातील कर्मवीर भाऊसाहेब हांडे शिक्षण शास्त्र महाविद्यालयामागील मैदान मंडप उभारणीसाठी देण्यात आले आहे. संस्थेतर्फे या पक्रमाचे स्वागत करतानाच करतानाच कोरोना महामारी संदर्भातील शासकीय धोरण व नियम पाळण्याच्या अटींसह मैदानावर संमेलन घेण्याची मान्यता दिली आहे. यासंदर्भातचे पत्र संस्थेचे शिक्षण अधिकारी प्रा. एस के शिंदे यांनी स्वागताध्य शशि उन्हवणे, मुख्य संयोजक राजू देसले, राज्य संघटक किशोर ढमाले, स्वागत समितीचे राज निकाळे, प्रभाकर धात्रक, व्ही. टी. जाधव यांच्याकडे सुपूर्त केले.
इन्फो-
संमेलन स्थळाला ऐतिहासिक वारसा
मविप्रच्या या मैदानाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. संस्थेचे दिवंगत सरचिटणीस डॉ. वसंतरावजी पवार यांच्या पुढाकारातून याच मैदानावर २००५ मध्ये मैदानावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आता याच मैदानावर महात्मा फुले यांच्या मराठी साहित्यविषयक भूमिकेवर विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात विद्रोही आंबेडकरवादी साहित्यिक वामनदादा कर्डक , बाबुरावजी बागूल व कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे.