बेकायदा कामांना विरोध केल्यानेच झगडे यांची बदली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:00 AM2018-03-01T02:00:31+5:302018-03-01T02:00:31+5:30

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केल्याने त्यामागील कारणांची चर्चा होत असून, झगडे यांनी पदभार घेतल्यानंतर ज्या पद्धतीने बेकायदेशीर कामकाजाच्या विरोधात मोहीम उघडली होती, त्यामुळेच ही बदली झाल्याचे बोलले जात आहे.

Rebellion of the fight against illegal acts? | बेकायदा कामांना विरोध केल्यानेच झगडे यांची बदली?

बेकायदा कामांना विरोध केल्यानेच झगडे यांची बदली?

Next

नाशिक : अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असताना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केल्याने त्यामागील कारणांची चर्चा होत असून, झगडे यांनी पदभार घेतल्यानंतर ज्या पद्धतीने बेकायदेशीर कामकाजाच्या विरोधात मोहीम उघडली होती, त्यामुळेच ही बदली झाल्याचे बोलले जात आहे. महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे वृत्त कळताच काहींनी आनंद व्यक्त केला, तर काहींनी हळहळ बोलून दाखविली. झगडे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर शिस्तीचे प्रदर्शन घडविण्याबरोबरच पारदर्शक व गतिमान कारभाराचा आग्रह धरला व त्यातून महसूल तसेच विकास यंत्रणेच्या अधिकाºयांच्या बैठका घेऊन त्यांना दप्तर दिरंगाई व बेकायदेशीर कामकाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. काही नाठाळ अधिकाºयांवर त्यांनी कारवाईची शिफारसही केल्याने झगडे यांच्या कामकाजावर अकार्यक्षम अधिकारी नाराज होते. मनमानी कारभार करणारे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या बदलीची शिफारस झगडे यांनीच केली होती. जिल्ह्यातील शासकीय जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार, बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक, राजकीय हस्तक्षेपास नकार देण्याचे काम झगडे यांनी केल्यामुळेच त्यांची बदली केली गेल्याचे बोलले जात आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानाची दोनशे कोटी रुपये किमतीची सुमारे १७५ एकर जमीन परस्पर देवस्थान विश्वस्तांनी बांधकाम व्यावसायिकाला विक्री केल्याची बाब झगडे यांनी गेल्या आठवड्यात उघडकीस आणून या घोटाळ्याला हातभार लावणारे महसूल विभागातील तहसीलदार, तत्कालीन प्रांत, तलाठी व मंडळ अधिकाºयांसह २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत दान केली गेलेली जमीन भूदान समितीच्या सांगण्यावरून महसूल खात्याने परस्पर बांधकाम व्यावसायिकाला कोणताही मोबदला न घेता दिल्याच्या घोटाळ्याची दखल घेत झगडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे काही राजकीय व्यक्ती व बांधकाम व्यावसायिकांच्या दबावामुळेच सरकारने झगडे यांची बदली केल्याची चर्चा होऊ लागली आहे. झगडे यांनी केलेल्या कारवाईचा तडाखा बसलेल्या काही अधिकाºयांनी त्यांची बदली करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते.
महिन्यापूर्वीच झगडे यांना पदोन्नती
विभागीय आयुक्त महेश झगडे यांना १ जानेवारी २०१८ रोजी राज्य शासनाने वरिष्ठ वेतनश्रेणीत प्रधान सचिव म्हणून पदोन्नती दिली होती. परंतु झगडे हे नाशिकचे विभागीय आयुक्त असल्यामुळे ते ज्या पदावर आहेत, ते पददेखील प्रधान सचिव दर्जाचे उन्नत करण्यात आले होते. आता त्यांना थेट प्रधान सचिव या पदावरच नेमणूक देण्यात आली आहे. झगडे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावरदेखील आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, त्यांच्या नेतृत्वात सन २००३-०४ चा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी पार पडला होता.

Web Title: Rebellion of the fight against illegal acts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.