दिवाळीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:07 AM2019-11-12T01:07:30+5:302019-11-12T01:07:50+5:30
दिवाळीच्या सुटीनंतर शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि.११) सुरू झाल्या असून, शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रास प्रारंभ झाल्याने शहरांमधील विविध शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या आहे.
नाशिक : दिवाळीच्या सुटीनंतर शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि.११) सुरू झाल्या असून, शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रास प्रारंभ झाल्याने शहरांमधील विविध शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या आहे.
यावर्षी ऐन दिवाळीत काळात राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांच्या पार पडल्यामुळे निवडणूकप्रक्रियेसाठी शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे शिक्षकांची दिवाळीची सुटी दोन दिवसांनी कमी झाल्याने शिक्षकांनी सुटीचा कालावधी वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारपासून (दि. १३) प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होणार आहे. परंतु, इंग्रजी शाळांच्या द्वितीय सत्राला नियमितपणे प्रारंभ झाला आहे.
त्यानुसार निवडणुकीच्या कामानिमित्त वापरण्यात आलेल्या सुट्या या दिवाळीनंतर अतिरिक्तसुट्या म्हणून देण्यात आल्याने शासकीय अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा बुधवारपासून सुरू होणार असल्या तरी इंग्रजी शाळा मात्र सोमवारपासूनच गजबजल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अद्याप दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मात्र इंग्रजी शाळांचे द्वितीय सत्र सोमवारपासून सुरू झाल्याने शाळांचा परिसर पुन्हा एकदा गजबजला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी काही शाळांना दोन तासच सुट्टी देण्यात आली तर अन्य काही शाळा नियोजित वेळेप्रमाणे सुरू होत्या. दरम्यान, महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळाही बुधवारपासून सुरू होणार आहेत.
शाळांना सुटी; शिक्षक मात्र कार्यरत
विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान
घेण्यात आले. अनेक शाळांमध्ये मतदानाचे बूथ लावण्यात आले होते. त्यामुळे शाळांना सुटी असली तरी शिक्षकांना मात्र दि. २० व २१ आॅक्टोबर रोजी निवडणुकीसाठी कार्यरत रहावे लागले. मतदानप्रक्रिया व निकाल यामुळे दिवाळीच्या सुटीमध्ये वाढ करून देण्याची मागणी माध्यमिक विभागाच्या शिक्षक व मुख्याध्यापक संघाकडून केली जात होती.