स्मार्टरोडवर नियमभंग कराल तर घरपोच दंडाची पावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 01:08 AM2019-11-24T01:08:09+5:302019-11-24T01:08:28+5:30
शहरातील पहिला अत्याधुनिक मार्ग म्हणून स्मार्टरोडची ओळख होणार आहे. या मार्गावर आता खास सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्र्यंबकनाका, सीबीएस आणि मेहर सिग्नल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सिंक्रोनाइज्ड असतील.
नाशिक : शहरातील पहिला अत्याधुनिक मार्ग म्हणून स्मार्टरोडची ओळख होणार आहे. या मार्गावर आता खास सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्र्यंबकनाका, सीबीएस आणि मेहर सिग्नल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सिंक्रोनाइज्ड असतील. त्यामुळे या मार्गावरून जाताना सिग्नल नियमाचे उल्लंघन केले तर वाहनाच्या नंबर प्लेटच्या आधारे थेट घरपोच वाहतूक पोलिसांकडून दंडाची पावती पाठविली जाणार आहे. शनिवारी (दि.२३) यासंदर्भात पोलीस अधिकारी आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
स्मार्ट सीटी अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यान स्मार्टरोड साकारण्यात येणार आहेत हा मार्ग अधिक प्रशस्त करतानाच त्यावरील वाहतूक सुरळीतपणे चालावी, अपघात होऊ नये आणि वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी सीसीटीव्हीच्या खास तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. हे विशेष कॅमेरे शासनाच्या महाआयटीमार्फत बसवण्यात येणार असून, त्या अनुषंगाने शनिवारी (दि.२३) पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौघुले, नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आणि महाआयटी कंपनी त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी स्मार्टरोडची पाहणी केली.
या रोडवर एएमपीआर तसेच आरव्हीसीडी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत त्यातील पहिल्या प्रकारचे कॅमेरे हे वाहनांच्या नंबर प्लेट रिड करतात, तर दुसºया प्रकारचे कॅमेरे सिग्नलवरील वाहतूक नियमांचे उल्लंघन तपासतात. त्यामुळे वाहतूक नियमांचा भंग केल्यास नंबर प्लेटवरून रिडिंग होऊन त्यांंच्या घरी वाहतूक दंडाची नोटीस घरपोच दिली जाऊ शकतो. तिन्ही सिग्नल सिंक्रोनाइज्ड करण्यात येणार, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी प्रकाश थविल यांनी सांगितले.
शहरात ४७ जंक्शनवर सीसीटीव्ही
वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी स्मार्टरोडवर सीसीटीव्हीचा प्रयोग डिसेंबर महिन्यात करण्यात येईल त्यानंतर शहरातील ४७ सिग्नल जंक्शनवर अशाच प्रकारे सीसीटीव्ही बसविण्यात येईल, अशी माहिती प्रकाश थविल यांनी दिली.