संमेलनाचे ‘पालकत्व’ निभावू शकणारे नेतृत्वच होणार स्वागताध्यक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:27+5:302021-01-13T04:33:27+5:30
नाशिक : दीड दशकानंतर नाशिकला होणाऱ्या यंदाच्या साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष कोण होणार, याबाबतच्या चर्चेला बहर आला आहे. साहित्य ...
नाशिक : दीड दशकानंतर नाशिकला होणाऱ्या यंदाच्या साहित्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष कोण होणार, याबाबतच्या चर्चेला बहर आला आहे. साहित्य संमेलनाचे ‘पालकत्व’ निभावू शकणाऱ्या नेतृत्वालाच यंदाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान देण्यात येणार असल्याची शहरातील साहित्य वर्तुळात चर्चा आहे.
कोणतेही साहित्य संमेलन भरवायचे म्हटले की त्यात सर्वप्रथम दोन नावांची चर्चा सर्वाधिक होते. त्यात पहिले असते ते संमेलनाध्यक्ष, तर दुसरे असते स्वागताध्यक्ष. त्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष हे स्थानिक साहित्यिक, नेतृत्व श्रेणीतील असते. त्यानुसार नाशिकच्या प्रस्तावित साहित्य संमेलनासाठीदेखील अशाच दमदार नेतृत्वाकडे स्वागताध्यक्ष पद सोपवले जाण्याची चर्चा आहे. त्यासाठी संबंधित नेतृत्वाची मनधरणी करण्यासाठी रविवारी (दि.१०) बैठक होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. अर्थात, स्वागताध्यक्षांची अधिकृत निवड होण्यापूर्वी अस्थायी समिती आणि स्वागत समिती नेमण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या दोन्ही समित्यांची बैठक होऊन त्यात सर्व अधिकार संबंधितांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय होईल. त्यानंतर येत्या आठवडाभरात स्वागताध्यक्षांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकणार आहे. त्यानंतर दोन दिवसात म्हणजेच येत्या आठ-दहा दिवसांत स्वागताध्यक्षपदाची अधिकृत घोषणा होण्याची चिन्हे आहेत.
इन्फो
नाशिकमधील परंपरा
नाशिकमध्ये यापूर्वी १९४२ साली झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अष्टपैलू साहित्यिक संपादक आचार्य अत्रे होते. मात्र, त्या काळात स्वागताध्यक्ष असे स्वतंत्र पद निर्माण करण्याची परंपरा नसल्याने त्या संमेलनासाठी कोणीही स्वागताध्यक्ष नव्हते. मात्र, २००५ या वर्षी झालेल्या साहित्य संमेलनासाठी आमदार डॉ. वसंत पवार यांनी पुढाकार घेत औरंगाबादला जाऊन महामंडळाला निमंत्रण देण्यासह तब्बल ६३ वर्षांनी संमेलन नाशिकला खेचून आणले होते. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. वसंत पवार, तर संमेलनाच्या अध्यक्षपदी केशव मेश्राम होते. त्यामुळे आता नवीन स्वागताध्यक्षपदीदेखील नाशिकच्या सक्षम नेतृत्वाचीच निवड होण्याची चर्चा आहे.