रजबनिमित्त घराघरांत ‘फातिहा’ पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:15+5:302021-03-08T04:15:15+5:30
सालाबादप्रमाणे यंदाही इस्लामी कालगणनेनुसार उर्दू महिना रजबच्या 22 तारखेला अर्थात रविवारी मुस्लीम बांधवांनी हजरत इमाम जाफर सादिक तसेच हजरत ...
सालाबादप्रमाणे यंदाही इस्लामी कालगणनेनुसार उर्दू महिना रजबच्या 22 तारखेला अर्थात रविवारी मुस्लीम बांधवांनी हजरत इमाम जाफर सादिक तसेच हजरत आमिर मुआवीया यांच्या स्मरणार्थ फातिहा पठण केले. घराघरात सकाळी या कार्यक्रमाची रेलचेल पाहावयास मिळाली बालगोपाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. लहान मुलांनी नवीन कपडे परिधान करून आपापल्या परिसरातील नागरिकांच्या घरी भेटी देत खीर-पुरीचा आस्वाद घेतला. शहरातील जुने नाशिक, वडाळागाव, वडाळारोड, पखालरोड, आदी मुस्लीम बहुल भागांमध्ये या कार्यक्रमाची लगबग पहावयास मिळाली. या कार्यक्रमापासून मुस्लीम बांधवांना रमजान पर्वचे वेध लागण्यास सुरुवात होते. कारण येथून पुढे केवळ एक ते दीड महिन्यांवर रमजान पर्व येऊन ठेपलेले असते. येत्या गुरुवारी (दि.११) या वर्षातील ''शब ए मेराज'' ही पवित्र मोठी रात्र येत आहे. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर व अल्लाह यांच्या भेटीची रात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रात्रीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. दरवर्षी ही रात्र रजब महिन्याच्या २७ तारखेच्या प्रारंभी साजरी केली जाते.