मालेगाव मनपातर्फे कोरोना परिस्थिती हाताळण्यात बेपर्वाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:04+5:302021-05-14T04:15:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : महानगरपालिकेकडून कोरोना परिस्थिती हाताळण्यात होत असलेली बेपर्वाई रोखण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : महानगरपालिकेकडून कोरोना परिस्थिती हाताळण्यात होत असलेली बेपर्वाई रोखण्यासाठी शासन स्तरावरून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने बेन्स सर्किट वापर करावा, स्वॅब अहवाल रोज तपासणीस पाठविण्यात यावा व स्वॅब घेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी व्यवस्था करावी, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, महिला रुग्णालय येथे कोरोना व इतर चाचणी करण्यासाठी पॅथॅलाॅजी उभारावी, आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीपेक्षा जास्त भयंकर परिस्थिती कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे सध्या निर्माण झाली आहे. मालेगावी महसूल, मनपा, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांच्यात समन्वय आढळत नाही. रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला, रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाला व तो रोखण्यात प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले. रुग्णांची परिस्थिती पाहून तज्ज्ञ डॉक्टरांच्या शिफारसीवर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळणे आवश्यक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.