बहुरंगी लढतीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: February 8, 2017 10:37 PM2017-02-08T22:37:49+5:302017-02-08T22:38:04+5:30
नांदूरशिंगोटे गटात चुरस : शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रासप उमेदवारांसह अपक्ष मैदानात
शैलेश कर्पे सिन्नर
तालुक्यात पुरुषांसाठी एकमेव आखाडा असलेल्या नांदूरशिंगोटे गटात उमेदवारी मिळविण्याची प्रचंड चुरस संपल्यानंतर आता मैदान मारण्यासाठी उमेदवार व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रासप या प्रमुख पक्षांनी या गटातून उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. काही अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरल्याने बहुरंगी लढत होणार आहे. मात्र खरी लढत राष्ट्रवादीचे बाळासाहेब वाघ, भाजपाचे मंगेश शेळके व शिवसेनेचे नीलेश केदार यांच्यातच पाहायला मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून या गटावर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यापूर्वी पंधरा वर्षे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचा बालेकिल्ला म्हणून सदर गट ओळखला जायचा. यावेळी कोकाटे यांच्या ताब्यातील नांदूरशिंगोटे गटावर भगवा फडविण्यासाठी शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे यांनी कंबर कसल्याने कोकाटे व वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ यांना भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक आखाड्यात प्रवेश केला आहे. कोकाटे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघ यांनी बंडखोरी करीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी केल्याने त्याचा फायदा किंवा तोटा कोणाला होतो किंवा वाघ हेच मैदानात बाजी मारतात का याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी दोडीचे नीलेश केदार, नांदूरशिंगोटेचे दीपक बर्के व मऱ्हळ येथील रमेश कुटे यांच्यात चुरस होती. केदार व बर्के यांच्यात समझोता झाला. बर्के यांच्या पत्नी शोभा बर्के यांना नांदूरशिंगोटे गणातून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली, तर नीलेश केदार शिवसेनेचे गटाचे उमेदवार झाले. तथापि, रमेश कुटे यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज शिल्लक आहे. येत्या १३ तारखेला माघार असून, कुटे यांना माघार घेण्यासाठी सेना नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. नीलेश केदार दोडी गावचे रहिवासी असून, त्यांना राजकीय वारसा आहे. भाजपाकडून मंगेश लक्ष्मण शेळके व बाळासाहेब वाघ इच्छुक होते. मात्र कोकाटे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच शेळके यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या वाघ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपाने पंचायत समितीचे माजी उपसभापती व बाजार समितीचे संचालक लक्ष्मण शेळके यांचे पुत्र मंगेश शेळके यांना मैदानात उतरविले आहे. मंगेश शेळके यांच्या उमेदवारीला कोकाटे यांनी पसंती दिल्याने वाघ यांची उमेदवारी डावलून मंगेश शेळके भाजपाचे उमेदवार झाले आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेसने बाळासाहेब वाघ यांना उमेदवारी दिली आहे. वाघ यांनी यापूर्वी २००७ ते २०१२ या काळात नांदूरशिंगोटे गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर शाईफेक आंदोलन केल्यामुळे हेमंत गोडसे व बाळासाहेब वाघ यांना काही दिवस तुरुंगात जाण्याची वेळ आली होती.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी पांगारकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून नांदूरशिंगोटे गटातून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना यश आले नव्हते.
सिन्नर तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विलास पगार यांनीही अपक्ष म्हणून जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अॅड. पगार यांच्या पत्नी सुनीता पगार यांनी यापूर्वी पांगरी गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून उमेदवारी केली होती. त्यावेळी त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. यावेळी अॅड. पगार पांगरी गणातून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार होते. मात्र त्यांना सेनेने तिकीट नाकारले. अॅड. पगार यांनी नांदूर गटातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अॅड. पगार यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नांदूरशिंगोटे गटातून वावीचे उपसरपंच विजय काटे, पांगरी ग्रामपंचायतीचे सदस्य सुभाष पगार, मऱ्हळ येथील रमेश कुटे, अॅड. विलास पगार यांचेही अपक्ष उमेदवारी अर्ज आहेत. अपक्ष उमेदवार माघार घेतात का निवडणूक बहुरंगी करतात, हे सोमवारी माघारीच्या दिवशी ठरेल.