दारणा फाटा ते कवडदरा रस्त्याला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 09:14 PM2021-01-27T21:14:04+5:302021-01-28T00:44:39+5:30
वाडीवऱ्हे : घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांना जोडणाऱ्या दारणा फाटा (वाडीव-हे जवळ) ते कवडदरा फाटा या रस्त्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. हा रस्ता १६ किलोमीटरचा असून याकामी सुमारे २५० कोटी रुपये खर्च येणार आहे.
वाडीवऱ्हे : घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांना जोडणाऱ्या दारणा फाटा (वाडीव-हे जवळ) ते कवडदरा फाटा या रस्त्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. हा रस्ता १६ किलोमीटरचा असून याकामी सुमारे २५० कोटी रुपये खर्च येणार आहे.
या रस्त्यामुळे घोटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयाची कनेक्टीव्हिटी तसेच इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल अवघ्या काही मिनिटात नाशिकमध्ये पोहचविणे सोपे होणार आहे. नाशिक येथून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी असून, रस्त्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत असते. प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी, याबरोबरच इगतपुरी तालुक्यातील गावागावामधील दळणवळण वाढण्यासाठी दारणा फाटा ते कवडदरा फाटा यादरम्यान रस्ता असावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. या प्रस्तावित १६ किलोमीटरच्या रस्त्याला मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. घोटी-सिन्नर महामार्गावर कवडदरा फाटा असून, नाशिक-मुंबई महामार्गावर दारणा फाटा आहे. कवडदरा फाटा ते दारणा फाटा हे अंतर १६ किलोमीटरचे आहे. या रस्त्यावर बेळगाव कुऱ्हे, अस्वली स्टेशन, दारणा डॅम, साकूर फाटा, कवडदरा आदी गावे आहेत. या प्रस्तावित रस्त्याला पायाभूत समितीने मान्यता दिल्याने आता लवकरच कामास प्रारंभ होणार आहे.
सुमारे २५० कोटीचा खर्च
सदर रस्त्याचे काम २५० कोटी रुपयाचे असून बांधकामावर प्रत्यक्ष खर्च १६२.७ कोटी रुपये होणार आहे. उर्वरित खर्च भूसंपादनासाठी होणार आहे. या रस्त्यावर चार मोठे पूल तर तीन लहान पूल असणार आहेत. ३७ पाईप मोऱ्या असून २ मोठे आणि १५ लहान चौक असणार आहेत. या रस्त्यासाठी ४०.७३ हेक्टर जमिनीची गरज असून, पैकी २३.१३ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे १७.६० हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे.