प्रेम व आकषर्णातील भेद ओळखून विवेकी बुद्धीने निवडा साथीदार -महेंद्र नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:39 PM2020-02-06T18:39:23+5:302020-02-06T18:46:55+5:30
युवा संकल्प परिषदेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर महेंद्र नाईक व निशा फडतरे यांनी उपस्थितांना प्रेम आणि आकर्षण यांतील भेद लक्षात आणून देतानाच विवाहाच्या प्रचलित पद्धती आणि परिचयोत्तर विवाह संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले.
नाशिक : प्रेम आणि आकर्षण या दोन वेगवेगळ्या गोष्टी असून, आयुष्याचा जोडीदार निवडताना या दोन्ही गोष्टींमध्ये फरक करता येणे आवश्यक आहे. त्यामुळे जोडीदार निवडण्याची प्रक्रिया ही विवेकी बुद्धीने होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अंनिसचे महेंद्र नाईक यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक यांच्यातर्फे मविप्रच्या फार्मसी महाविद्यालयात गुरुवारी (दि.६) राज्यव्यापी युवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आयोजित युवा संकल्प परिषदेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर महेंद्र नाईक व निशा फडतरे यांनी उपस्थितांना प्रेम आणि आकर्षण यांतील भेद लक्षात आणून देतानाच विवाहाच्या प्रचलित पद्धती आणि परिचयोत्तर विवाह संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. सुदेश घोडेराव, जिल्हा सचिव अॅड. समीर शिंदे उपस्थित होते. महेंद्र नाईक म्हणाले, प्रेमात हिंसेला स्थान नसते. परंतु, प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजला नाही तर चुकीचा जोडीदार निवडला जाऊन त्याचे विपरीत परिणाम समोर येतात. त्यामुळे जोडीदार विवेकी विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. निशा फडतरे म्हणाल्या, कथा, कादंबºया, नाटक, सिनेमा आणि वेगवेगळ्या वाहिन्यांच्या मालिकांमधून दाखविले जाणारे प्रेम हे मूळ प्रेमाच्या भावनेपासून खूप दूर आहे. अशा माध्यमातून केवळ प्रेम लादण्याची भाषा दिसून येते. प्रत्यक्षात प्रेम हे परस्परांच्या संमतीने होते. परंतु हा विचारच मागे पडल्याने महाराष्ट्रासह देशभरात एकतर्फी प्रेमातून हिंसाचाराचे प्रकार घडत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेत पालकांची भूमिका महत्त्वाची असून, पालक आणि मुलांमध्ये जोडीदार निवडण्याची प्रक्रिया लादली न जाता दोघांमधील संवादातून ही प्रक्रिया घडणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, तरुणांना जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अंनिसने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विशेष अभ्यासक्रम चालविला असून, या मोहिमेत सहभागी होऊन तरुणांनी त्यांच्या आयुष्यातील जोडीदाराची विवेकी पद्धतीने निवड करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीप डेर्ले यांनी, सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया संधान यांनी केले. तर डॉ. मिलिंद वाघ यांनी आभार मानले.