रुग्णसंख्या दडवणाऱ्या रुग्णालयांची मान्यता रद्द करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:11 AM2021-06-19T04:11:24+5:302021-06-19T04:11:24+5:30
मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाचा कहर हाेता. त्या काळात शहरातील १८८ रुग्णालयातील सुमारे साडे आठ हजार बेड फुल्ल असल्याचे ...
मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाचा कहर हाेता. त्या काळात शहरातील १८८ रुग्णालयातील सुमारे साडे आठ हजार बेड फुल्ल असल्याचे सांगितले जात हेातेे. कोरोना बाधितांना एकेक बेडसाठी सर्व शहर पिंजून काढावे लागत होते. अनेकांना बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन काळात महापालिकेने खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स आरक्षित केले होते. नियमानुसार अशा बेडवर दाखल रुग्णांची बिले संबंधित रुग्णालयांनी महापालिकेच्या लेखा परीक्षण विभागाला सादर करणे आवश्यक हेाते. मात्र, अनेकांनी बिले सादर न केल्याने त्या ठिकाणी रुग्णच दाखल नव्हते आणि सर्व रुग्णालयांच्या व्यवस्थापन कोट्यातच रुग्ण दाखवले, असे महापालिकेचे म्हणणे असून त्यामुळे ५१ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या नोटिसीनंतर २० रुग्णालयांनी महापालिकेला बिले सादर केल्याने त्यांचे बिंग फुटले असून रिक्त बेडसवर रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही रुग्णालयांनी सोमवारपर्यंत (दि.२१) मुदत मागवून घेतली आहे. तर काही रूग्णालयांकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सोमवारपर्यंत वाट बघून मुख्य लेखा परीक्षक बी. जी. साेनकांबळे कोविड रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करणार आहेत.
इन्फो..
महापालिकेने नोटिसा बजावल्यानंतर काही रुग्णालयांनी एकत्र येऊन महापालिकेला प्रतिप्रश्न करणारे निवेदन सादर केले आहे. त्यात अशाप्रकारचे नोटिसांचा काय अधिकार असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, कोणत्याही संघटना अथवा रुग्णालयाच्या शीर्षपत्रावर हे निवेदन नाही. त्याच निवेदनाखाली नाव न टाकता स्वाक्षरी केल्याने त्याचे प्रत्युत्तर कोणाला द्यावे असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. तथापि, अशाप्रकारचे निवेदने गांभीर्याने घेतले जात नसल्याने हे निवेदन निरस्त करणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले.