अनुदानित शाळांमधील वाढीव शिक्षकांना मान्यता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:42+5:302021-04-19T04:12:42+5:30
शिक्षक महासंघ : कोरोना काळात आर्थिक मदतीचीही केली मागणी नाशिक : राज्यातील अनुदानित शाळांमधील वाढीव पदांवर कार्यरत शिक्षकांना त्वरित ...
शिक्षक महासंघ : कोरोना काळात आर्थिक मदतीचीही केली मागणी
नाशिक : राज्यातील अनुदानित शाळांमधील वाढीव पदांवर कार्यरत शिक्षकांना त्वरित मान्यता व तोपर्यंत कोरोना काळात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण महासंघाने केली आहे. या संदर्भात महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष डॉ.संजय शिंदे यांनी दिली आहे.
राज्यातील अनुदानित शाळांमधील वाढीव पदांवर कार्यतर शिक्षकांना अनेक वर्षे विना वेतन अध्यापन कार्य करावे लागते. शासन निर्णयानुसार दरवर्षी आढावा घेऊन त्याबाबत निर्णय झाला नसल्याने, या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शैक्षणिक वर्ष २००२-०३ ते २०१८-१९ या काळातील शिक्षकांची सर्व माहिती शिक्षण संचालनालयाने शासनाकडे सादर केलेली आहे. त्यामुळे या शिक्षकांना तत्काळ मान्यता देण्यात यावी. त्याचप्रमाणे, जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोरोना काळात शासनाने या शिक्षकांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे अध्यक्ष डॉ.संजय शिंदे, सचिव संतोष फाजणे, समन्वयक प्रा.मुकुंद आंदळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.