जबाबदारी ओळखून काम करा : सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:36 AM2018-03-03T00:36:09+5:302018-03-03T00:37:09+5:30
नाशिक : आतापर्यंत विरोधकांच्या भूमिके त आंदोलने, निदर्शने, निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून, जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकाºयांनी व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहका-रमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपाच्या नाशिक जिल्हा व शहर मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदा- धिकारी व कार्यकर्त्यांचा शुक्रवारी (दि. २) मेळावा घेतला, यावेळी ते बोलत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. राष्ट्र व राज्य वैभवशाली होण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करताना देशमुख यांनी अप्रत्यक्षरीत्या पक्षांतर्गत स्थानिक पातळीवर सुरू असलेली मतमतांतरे दूर करून एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकरच बूथप्रमुख व पदाधिकाºयांच्या नियुक्त्या होतील, त्यांनाही प्रशिक्षित करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. पक्षात कार्यकर्ता पद हेच शेवटपर्यंत असते. त्यामुळे कार्यकर्ता म्हणूनच सर्वांनी काम करण्याची गरज असून, पक्षाशिवाय कोणालाही शून्य किंमत असल्याचे सांगत त्यांनी पदाधिकाºयांना सुनावले. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक दिनकर पाटील, विजय साने आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याच्या राजकारणाचा आधार
राज्याच्या राजकारणाचा मूळ आधार सहकारी संस्था असल्याचे भाजपाने हेरले असून, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना नव्याने सहकारी संस्था उभ्या करण्याचे आवाहन केले. तसेच या सहकारी संस्थांच्या माध्यमातून संघटना आणखी मजबूत करण्याचा सल्लाही देशमुख यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.