टोकडेच्या सरपंचाला पदावरून दूर करण्याची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:12+5:302020-12-31T04:16:12+5:30
टोकडे ग्रामपंचायतीने केलेल्या कामांबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी मालेगाव गट विकास अधिकाऱ्यांकडे दोन वर्षापूर्वी तक्रार केली होती. ग्रामपंचायतीने ...
टोकडे ग्रामपंचायतीने केलेल्या कामांबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी मालेगाव गट विकास अधिकाऱ्यांकडे दोन वर्षापूर्वी तक्रार केली होती. ग्रामपंचायतीने केलेले स्मशानभूमी, क्रीडांगण, सभामंडप, संगणक कक्ष, गाळे, शाळेचे कंपाऊंड, शौचालय, चौक सुशोभिकरण आदी कोट्यवधी रूपये खर्च करून कामे केली असली तरी, प्रत्यक्षात सदरची कामे झाली नसल्याचे तर काही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे कागदोपत्री पुरावेही सादर केले होते. मात्र या तक्रारीची चौकशी होत नसल्याने मालेगाव पंचायत समितीसमाेर तसेच जिल्हा परिषदेसमोर ग्रामस्थांनी आंदोलने केली होती. अखेर या कामांची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करण्यात येऊन त्याची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासमोर झाली. त्यावेळी तक्रारदार, सरपंच, ग्रामसेविकांना पाचारण करण्यात येऊन त्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. सदरची चौकशी पूर्ण होऊन बनसोड यांनी आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला असून, त्यात सरपंच सुपडाबाई पंडीत निमडे, ग्रामसेविका सुमित्रा पुंजाराम गायकवाड हे दोषी आढळले. त्यानुसार सरपंच निमडे यांना पदावरून दूर करण्याची शिफारस करण्यात आली तसेच ग्रामसेविका गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे.
चौकट====
शाखा अभियंत्यावर कारवाई
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शाखा अभियंत्यांची असताना देखील त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका या चौकशी अहवालात ठेवण्यात आला असून, त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.