पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी टाकण्याबाबत फेरविचाराची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 04:49 PM2019-02-05T16:49:56+5:302019-02-05T16:50:05+5:30
पुनंद प्रकल्प : शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणेकरांना पाणी देण्यास कुठलाही विरोध नाही मात्र, जलवाहिनी टाकण्यास तीव्र विरोध केला जाईल. या जलवाहिनीसंदर्भात शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे. दरम्यान, येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणा-या भूमिपूजन कार्यक्रमालाही शेतक-यांनी विरोध दर्शविला असून भूमिपूजन करुन दाखवाच, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमटू लागल्या आहेत.
पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी टाकण्याच्या योजनेबाबत तालुक्यातील शेतक-यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सटाणेकरांना पाणी देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही.सटाण्यातील नागरिक हे आमचेच असून रक्ताच्या नात्यातील आहेत. जलवाहिनी ऐवजी नदीपात्रातून किंवा कालव्याने खुशाल पाणी घेऊन जावे. कळवण तालुक्यातील पाणी तालुक्यातच खेळवत ठेवत तालुक्याची हद्द संपल्यानंतर नदीपात्रालगत किंवा कालव्यालगत साठवण बंधारा बांधून खुशाल जलवाहिनी टाकून पाईपलाईनने पाणी घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करावे, अशी भूमिकाही शेतक-यांनी घेतली आहे. या जलवाहिनी संदर्भात शासनाने फेरविचार करावा अन्यथा कळवण तालुक्यातील आदीवासी व ग्रामीण भागातील जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी सरकारने तयार रहावे असे आव्हान शेतकरी बांधवांनी केले आहे.