वसाकासाठी अडीच लाख टन ऊसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 10:04 PM2020-10-17T22:04:10+5:302020-10-18T00:28:05+5:30
लोहणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव ...
लोहणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देण्याबरोबरच मागील देय रक्कम लवकरात लवकर देण्यास भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशिव साखर कारखान्याचे संचालक मंडळ कटिबद्ध आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उत्पादकांनी वसाकालाच ऊस पुरवठा करून गतवैभव प्राप्त करून द्यावे, असे आवाहन आमदार डॉ.राहुल आहेर यांनी केले. दरम्यान, यंदा अडीच लाख मे.टन उसाची नोंद झाल्याची माहिती कारखान्याकडून देण्यात आली.
धाराशिव साखर कारखाना संचलित वसाका युनिट -२ चा ब्रॉयलर अग्निप्रदीपन व ऊस मोळी टाकण्याचा कार्यक्र म शनिवारी (दि.१७) आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते वसाका कार्यस्थळावर झाला. यावेळी आहेर बोलत होते अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर होते. काही अपप्रवृत्तीमुळे मागील काळात वसाका कर्जाच्या डबघाईत अडकला होता. आता वसाकाला नवसंजीवनी मिळाली असून ऊस उत्पादक, सभासद, कामगारांनी एकजूट दाखवून व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले. ऊस उत्पादक शेतकºयांच्या बांधावर जाऊन वसाकाला जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी दिली. यावेळी वसाकाचे अवसायक राजेंद्र देशमुख, मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, वसाकाचे माजी उपाध्यक्ष संतोष मोरे, भरत पाळेकर, बाळासाहेब बच्छाव,महेंद्र हिरे, भाई दादाजी पाटील, अभीमन पवार, काशीनाथ पवार, आदींसह ऊस उत्पादक, कामगार मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्तविक व आभार कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी मानले.
ऊस तोडणी टोळ्या तैनात
वसाका कार्यक्षेत्रात साधारणत: दोन ते अडीच लाख मेट्रिक टन उसाची नोंद असून कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने ठेवले आहे. त्यादृष्टीने ऊस वाहतूकदार, ऊस तोडणी टोळ्या तैनात करण्यात आल्या आहेत. कार्यक्षेत्रातील उत्पादकांनी वसाकाला उस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी यावेळी केले.
फोटो - १७ वसाका शुगर