नाशिकच्या पर्यावरणप्रेमींचा विक्रमउदंड
By admin | Published: December 22, 2014 01:21 AM2014-12-22T01:21:01+5:302014-12-22T01:21:14+5:30
प्रतिसाद : विज्ञान एक्स्प्रेस-जैवविविधता गाडीचा चार दिवस नाशिकरोडला मुक्काम
नाशिक : रेल्वे गाडीत साकारलेली जैवसृष्टी पाहण्यासाठी नाशिककरांनी विक्रमी गर्दीची नोंद केली. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन झालेल्या या ‘विज्ञान एक्स्प्रेस’ला पहिल्याच दिवशी सुमारे साडेआठ हजार पर्यावरणप्रेमींनी भेट दिली. राज्यात इतका उदंड प्रतिसाद इतर कोणत्याही शहरात मिळाला नसल्याने चार दिवसांत गर्दीचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे.
भारताच्या जैवविविधतेची महती सांगणारी एक्स्प्रेस सध्या महराष्ट्राच्या रेल्वे रुळावरून धावत आहे. नाशिकमध्ये दाखल होण्यापूर्वी अमरावती, कराड, पुणे या शहरात विज्ञान एक्स्प्रेस थांबविण्यात आली होती. या शहरांमध्ये इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला नाही. मात्र नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद लाभला. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर पर्यावरणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. पहिल्या दिवशी १८ शाळा, ७७५ विद्यार्थी, ५६ शिक्षक, ४७० नर्सरीतील विद्यार्थी, ६७९० नागरिक आणि इतर अशा एकूण ८७४० जणांनी प्रदर्शन पाहिले.
सकाळी मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या हस्ते फित कापून या विज्ञान एक्स्प्रेसचा स्वागत करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने भारतभर ही रेल्वेगाडी प्रवास करणार आहे. विज्ञानाची कामगिरी लोकांपर्यंत पोहचावी या हेतुने सुरू करण्यात आलेल्या या गाडीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या गाडीचे व्यवस्थापक राघव पंड्या यांनी सांगितले. सदर प्रदर्शन विनामूल्य असून सव्वाकोटी पर्यावरणप्रेमींनी प्रदर्शनाची पाहणी केली आहे. (प्रतिनिधी)