गत आर्थिक वर्षामध्ये लासलगाव बाजार समितीत शेतमालाची विक्रमी आवक व उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 01:56 AM2022-04-29T01:56:03+5:302022-04-29T01:56:22+5:30
कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशाला कोरोनाकाळात शेतमालाने तारले असल्याचे दिसून आले. आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये येथे एक कोटी क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक झाली असून, १६९५ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे.
लासलगाव : कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशाला कोरोनाकाळात शेतमालाने तारले असल्याचे दिसून आले. आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये येथे एक कोटी क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक झाली असून, १६९५ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे.
आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या वर्षभरात एक कोटी एक लाख ६२ हजार क्विंटल कांदा व इतर शेतमालाची विक्रमी आवक झाली असून, त्यातून १६९५ कोटी २२ लाख ८० हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बाजार समितीच्या उलाढालीत ३८१ कोटींची वाढ झाली आहे, तर सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ८५ लाख ३४ हजार क्विंटल कांदा आवक होऊन फक्त कांदा विक्रीतून १३०५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३६६ कोटींनी उलाढालीत वाढ झाली आहे.
कांद्याची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ओळखली जाते. देशभरातील कांदा दर हे लासलगाव बाजार समितीवरून ठरतात. लासलगाव बाजार समितीने चांगली कामगिरी करीत १६९५ कोटी रुपयांची उलाढाल केली. अमावास्या आणि शनिवार असे वर्षातील ६० दिवस कामकाज वाढल्याने उलाढालीत विक्रमी वाढ झाली आहे, तर कांदा विक्रीतून बाजार समितीमध्ये १३०५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.
बाजार समितीत पारदर्शक आणि विश्वासार्ह कामकाज असल्यामुळे शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला पहिली पसंती असते. कांदा व इतर शेतमालाचे पैसे त्वरित मिळत असल्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांदा, धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंबासह आदी शेतमालाची उलाढाल वाढली आहे. सभापती सुवर्णा जगताप यांच्या पुढाकाराने गेल्या ७५ वर्षांपासून अमावास्येला बंद असलेले कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहे तसेच शनिवारीदेखील कांदा लिलाव सुरू राहणार असल्याने यंदा बाजार समितीची उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
लासलगाव बाजार समितीत कांद्याबरोबर धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंब आदी मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजार समितीचे आवारादेखील कमी पडू लागले आहे. मका व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येथे पहायला मिळत आहे. चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगावचा कांदा जगातील ७४ देशांत निर्यात केला जातो. देशाला कांदा निर्यातीतूनदेखील मोठे परकीय चलन मिळत आहे. एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या आर्थिक वर्षात देशाला कांदा निर्यातीतून २९७३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.
इन्फो
वर्ष शेतमाल आवक आणि उलाढाल
सन २०१८-१९ - ७६ लाख ९२ हजार क्विंटल - ६४३ कोटी
सन २०२०-२१ - ८१ लाख ४३ हजार क्विंटल - १३१४ कोटी
सन २०२१-२२ - १ कोटी १ लाख ६२ हजार क्विंटल -१६९५ कोटी