इगतपुरी तालुक्यात विक्रमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:01+5:302021-07-23T04:11:01+5:30
घोटी : इगतपुरी शहरासह तालुक्यात सलग पाच दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असून त्यात बुधवार मध्यरात्रीपासून तर पावसाचा जोर ...
घोटी : इगतपुरी शहरासह तालुक्यात सलग पाच दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असून त्यात बुधवार मध्यरात्रीपासून तर पावसाचा जोर अधिकच वाढल्याने विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही धुवाॅंधार पाऊस झाला आहे. इगतपुरी, घोटी परिसरासह पूर्ण तालुक्यात पावसाचा जोर अधिक चांगला राहिला आहे. पावसामुळे पुन्हा दारणा, वाकी, भाम या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. इगतपुरी तालुक्यात २४ तासांत विक्रमी २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. घोटी, इगतपुरीत सर्वाधिक पाऊस झाला असून दोन्ही शहरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे .दरम्यान, या परिस्थितीमुळे भावली व दारणा धरणांसह तालुक्यातील धरणांंमध्ये जलसाठा वेगाने वाढण्यास मदत होत आहे.
-------------------------
भातशेतीला तलावाचे स्वरूप
इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच भातशेतीमध्ये आज तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. तर पूर्वभागात झालेल्या पावसामुळे भातलागवडीच्या कामांना ब्रेक लागला आहे. दारणा, भाम व वाकी नदीचे पाणी शेतांमध्ये पसरल्याने भाताच्या रोपांना व पिकांना धोका होण्याचा संभव निर्माण झाला आहे. तर काही भागांत भाताची रोपे वाहून गेल्याचे वृत्त आहे. पश्चिम पट्ट्यातील डोंगरावरून पाण्याचे धबधबे मोठ्या प्रमाणात कोसळत आहेत. दारणा, भाम व वाकी या नद्या या मोसमात सलग चार दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहेत.
--------------------------
चोवीस तासांत घोटी शहरात १३२ मिलीमीटर तसेच इगतपुरी शहरात २४० मिलीमीटर, पाऊस झाल्याने धरण साठ्यांमध्ये ही भरीव वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील अति पावसाच्या भागात पावसाने आज पुन्हा जोरदार मुसंडी मारली आहे. घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पश्चिम पट्ट्यातील भावली मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, घोटी, देवळे, टाकेघोटी, कावनई, कारावाडी, अवळखेड, काराचीवाडी चिंचलेखैरे, तळेगाव, बलायदुरी, पारदेवी त्रिंगलवाडी मानवेढे, काळूस्ते, वैतारणा पट्टयात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेती जलमय झाल्याचे चित्र पाच सहा दिवसांपासून दिसून येत आहे.
---------------------
जनजीवन विस्कळीत
इगतपुरी तालुक्यात पश्चिम पट्ट्यात धरणाच्या पाणलोटक्षेत्रात धुवाॅंधार पाऊस झाल्याने धरणातील जलसाठ्यात कमालीची व झपाट्याने वाढ झाली आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक मोठी धरणे असल्याने या धरणातील जलसाठ्याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असते. तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भावली धरण क्षेत्रात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होत असल्याने या धरणातील साठाही झपाट्याने वाढला आहे. भावली धरणात आज अखेर ८६ टक्के जलसाठा निर्माण झाला असून दारणा नदीक्षेत्रातही मुसळधार पाऊस असल्याने दारणा धरणातही ७३ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. (२२ रेन १/२)
-------------
भावली - १२३३ दलघफ - ८६ टक्के
दारणा - ५२४० दलघफ - ७३ टक्के
मुकणे - २४५२ दलघफ - ३४.५५ टक्के
भाम - ८१५ दलघफ - ३३ टक्के
कडवा - २६४ दलघफ - १५.६४ टक्के
वाकी - ३२८ दलघफ - १३.१७ टक्के