विशेष मुलांच्या व्यायामाची ‘लिम्का’मध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:52 AM2018-07-01T00:52:26+5:302018-07-01T00:52:51+5:30
सुदृढ व निरामय शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी व्यायाम हवा, असा सल्ला डॉक्टरांकडून नेहमीच दिला जातो. मात्र नियतीने ज्यांच्या झोळीत अपंगत्व टाकले त्यांनीच प्रत्यक्ष संगीताच्या तालावर विविध प्रकारचे व्यायामाचे धडे गिरविणे हे विशेष! शहरातील सुमारे चारशे मानसिक अपंग असलेल्या विद्यार्थ्यांनी हा आविष्कार करून दाखविल्याने त्यांच्या या अनोख्या व्यायाम पद्धतीची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद झाली आहे.
नाशिक : सुदृढ व निरामय शरीर व मनाच्या स्वास्थ्यासाठी व्यायाम हवा, असा सल्ला डॉक्टरांकडून नेहमीच दिला जातो. मात्र नियतीने ज्यांच्या झोळीत अपंगत्व टाकले त्यांनीच प्रत्यक्ष संगीताच्या तालावर विविध प्रकारचे व्यायामाचे धडे गिरविणे हे विशेष! शहरातील सुमारे चारशे मानसिक अपंग असलेल्या विद्यार्थ्यांनी हा आविष्कार करून दाखविल्याने त्यांच्या या अनोख्या व्यायाम पद्धतीची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद झाली आहे. लिम्का बुकमध्ये अद्याप मानसिक अपंग मुलांच्या अशा कार्यक्रमाची कुठलीही नोंद नसल्यामुळे विक्रम नोंदविण्यासाठी प्रबोधिनी ट्रस्टकडून शनिवारी (दि.३०) अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हनुमानवाडी रस्त्यावर असलेल्या श्रद्धा लॉन्समध्ये सकाळी उगवत्या दिनकराच्या साक्षीने प्रबोधिनी ट्रस्टच्या पंडित कॉलनीमधील प्रबोधिनी विद्यामंदिर, सातपूर येथील सुनंदा केले विद्यामंदिर व प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळांमधील सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी या संगीतमय व्यायामाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी अध्यक्षस्थानी समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ. राजेंद्र कलाल, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. नीलेश पाटील, व्यायाम प्रशिक्षक प्रज्ञा तोरसकर, सुरेश पाटील उपस्थित होते. यावेळी तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित विद्यार्थ्यांनी विविध गीतांच्या तालांवर दैनंदिन व्यायामप्रकार करत उपस्थिताना थक्क केले. या व्यायाम प्रकारांमुळे या बौद्धिक अपंगत्व आलेल्या शारीरिक-मानसिक आरोग्य सुधारण्यासह दैनंदिन वर्तन समस्या कमी होण्यास मदत होणार आहे, असे तोरसकर यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी सुमारे सहा महिन्यांपासून अधिक कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांकडून तोरसकर यांनी सराव करून घेतल्याची माहिती रोहिणी अचवल यांनी दिली. ट्रस्टच्या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.
‘लिम्का’कडून दखल
प्रबोधिनी ट्रस्टच्या तीनही शाळांमधील ३ ते ६ व ६ ते ५५ वयोगटातील सुमारे चारशे मुलांनी संगीताच्या साथीने विविध गीतांच्या तालांमध्ये गुंफलेले व्यायामप्रकार क रून उपस्थितांना थक्क केले. सुदृढ शरीरयष्टी आणि बुद्धिमत्ता असलेल्या सर्वसामान्यांनाही लाजवेल असा त्यांचा व्यायाम वाखाण्याजोगा होता. अद्याप देशभरात कुठेही बौद्धिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या विविध गीतांच्या तालांवर व्यायामाचे धडे गिरविले नसल्यामुळे हा एकमेव कार्यक्रम ठरला. म्हणून ‘लिम्का बुक’मध्ये या कार्यक्रमाने स्थान मिळविले.