१२ कोटींची विक्रमी उलाढाल : टेरिकॉट टोपीचे अधिक उत्पादन येवल्याची टोपी लग्न समारंभातही खातेय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:11 AM2018-05-06T00:11:13+5:302018-05-06T00:11:13+5:30
येवला : येथील टोपीचे महत्त्व सदासर्वकाळ आहेच अन् आता लग्नाच्या धामधुमीत ते आणखी वाढलंय एवढंच ! १५० वर्षांची परंपरा असलेली येवल्याची टोपी सर्वत्रच दुखवट्यापासून ते लग्न समारंभातील मानपानापर्यंत अन् राजकीय फीवर चढविण्यासाठी गाजत आहे.
येवला : येथील टोपीचे महत्त्व सदासर्वकाळ आहेच अन् आता लग्नाच्या धामधुमीत ते आणखी वाढलंय एवढंच ! १५० वर्षांची परंपरा असलेली येवल्याची टोपी सर्वत्रच दुखवट्यापासून ते लग्न समारंभातील मानपानापर्यंत अन् राजकीय फीवर चढविण्यासाठी गाजत आहे. येवल्यात १० ते १२ टोपी बनविणारे घाऊक व्यापारी आहे. टोपीचे १५ ते २० प्रकार आहेत. येवल्यात खास करून मिनिस्टर टेरिकॉट टोपीचे उत्पादन अधिक आहे. भगवान टोपी अर्थात मंचरची बागायतदार टोपी. ही टोपी मंचरसह येवला व धुळे येथेही बनते. पांढरी स्वच्छ, भगवा, पिवळा अशा रंगांच्या टोप्या येवल्यात तयार केल्या जातात. गुणवत्तेनुसार ३ ते २० रुपयापर्यंत टोपी तयार होते. यावर सुमारे एक हजार महिला व पुरुषांचा चरितार्थ चालतो. साधारणपणे १२ ते १५ कोटी रुपयांची उलाढाल होत असावी, असा अंदाज आहे. टोपीला नाशिक, नगर, धुळे, औरंगाबाद, नागपूर व उर्वरित महाराष्ट्रात मागणी आहे. सहा महिने तेजी तर सहा महिने मंदी असणारा हा लघुउद्योग यासाठी जेवढी गुंतवणूक तेवढी कमाई अधिक असते. मंदीच्या सहा महिन्यांत जेवढी टोपी तयार होईल ती संपूर्णपणे लग्नसराईच्या हंगामात पुरविली जाते. जेवढी जागा, जेवढे भांडवल तेवढा उठाव अधिक व मागणीनुसार पुरवठा करणे हे अर्थशास्त्रीय गणित टोपी या लघुउद्योगाला तंतोतंत लागू पडते. सहा महिने मंदीच्या काळात साडी, परकर तयार करण्याचा उद्योगही काही टोपी उद्योजक येवल्यात करतात. टोपी तयार करण्याच्या मजुरीचे दर २० रुपये डझनपर्यंत आहे. साधारण एक टोपी तयार केली तर दीड ते पावणेदोन रुपये मिळतात.