पाच महिन्यांत ४५ कोटींची वसुलीं
By admin | Published: September 9, 2016 02:09 AM2016-09-09T02:09:47+5:302016-09-09T02:09:57+5:30
महापालिका : घरपट्टी- पाणीपट्टी वसुली संथगतीने
नाशिक : गतवर्षी पाच महिन्यांतच महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीतून ५० कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. यंदा मात्र वसुली संथगतीने सुरू असून, एप्रिल ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत ४५ कोटी रुपये महसूल जमा होऊ शकला आहे. एलबीटीसह अन्य स्त्रोतांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीकडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
मागील वर्षी मनपाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी घरपट्टी बिलावर सवलत योजना राबविली होती. २ ते ५ टक्क्यांपर्यंत सूट दिल्याने मनपाला आर्थिक वर्षाच्या प्रारंभालाच तीन महिन्यांत सुमारे ३६ कोटी रुपये केवळ घरपट्टीच्या माध्यमातून प्राप्त झाले होते. यंदाही घरपट्टीसाठी सवलत योजना राबविण्यात आली, परंतु गतवर्षाच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला. एप्रिल ते ७ सप्टेंबर २०१६ या पाच महिन्यांच्या कालावधीत ३७ कोटी ३१ लाख रुपये घरपट्टी वसूल झाली आहे. १ लाख ७४ हजार १४० मिळकतधारकांनी घरपट्टीची बिले भरली आहेत. मुदतीत बिले भरणाऱ्यांना मनपाने एकूण ५२ लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे. पाच महिन्यांत नाशिक पश्चिम विभागाने सर्वाधिक सात कोटी १८ लाख रुपयांची वसुली केली आहे, तर पंचवटी विभाग वसुलीत पिछाडीवर आहे. मागील वर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीतच ३९ कोटी ६४ लाख रुपयांची घरपट्टी, तर आठ कोटी ४० लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली होती. आॅगस्ट २०१५ अखेर वसुलीचा आकडा ५० कोटींच्यावर जाऊन पोहोचला होता. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत पाणीपट्टी सात कोटी ९६ लाख रुपये वसूल झाली. गत वर्षाच्या तुलनेत पाच कोटीने वसुलीत घट झालेली आहे. (प्रतिनिधी)