वीजबिलाच्या घोळात कृषीपंपाची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:14 AM2021-03-20T04:14:03+5:302021-03-20T04:14:03+5:30
नाशिक: मार्च अखेर असल्याने महावितरणकडून राज्यातील कृषी पंपधारकांकडून वीजबिलांची वसुली सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठीची सवलत योजना देखील मंजूर ...
नाशिक: मार्च अखेर असल्याने महावितरणकडून राज्यातील कृषी पंपधारकांकडून वीजबिलांची वसुली सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठीची सवलत योजना देखील मंजूर करण्यात आली आहे. मात्र कृषीपंपधारकांना आलेली बिले ही सरासरी तसेच दुप्पट आकाण्यात आल्याची तक्रार असतांना वसुलीसाठीचा तगादा शेतकऱ्यांना अन्यायकारक वाटत आहे.त्यामुळे सक्तीच्या वीजबिल वसुलीला शेतकऱ्यांनी विरोधही दर्शविला आहे.
राज्य सरकारने कृषि पंप वीज जोडणी धोरण २०२० व त्या अंतर्गत कृषि वीज बिल सवलत योजना जाहीर केली आहे. ही योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांची थकीत वीज बिले तपासली जातील व चुकीची सर्व वीज बिले दुरुस्त करण्यात येतील. असे जाहीर केले हेाते. परंतु ग्राहकांचे समाधान न करता वसुली सुरू करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. विनामीटर जोडणी असलेल्या ठिकाणी जोडभार तपासून बिले द्यावीत तर मीटर असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष रिडींग घेण्यात आलेले नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. प्रदीर्घ काळ मीटर बंद असतांना आलेल्या वीजबिलाबाबतही ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.
ग्राहकांना अचूक वीजबिले आली नसल्याने त्यांना योजनेचा देखील लाभ अपेक्षितपणे मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. योजना जाहीर केली मात्र चुकीच्या बिलांमुळे जो लाभ मिळायला हवा तो मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.