गौण खनिज भरारी पथकाची कोटींची वसुली
By admin | Published: January 22, 2017 12:16 AM2017-01-22T00:16:52+5:302017-01-22T00:17:04+5:30
उद्दिष्ट गाठणे कठीण : ६४९ वाहनांवर दंडात्मक कारवाई
नाशिक : वाळू माफियांकडून यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या धमक्या, पोलिसात दाखल झालेले खोट्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर यंदा गौण खनिजापोटी मार्चअखेर दिलेले ८९ कोटीचे उद्दिष्ट्य ओलांडणे महसूल खात्याला कठीण झाले असून, डिसेंबरअखेर वाळू माफियांवर करण्यात आलेल्या कारवाईपोटी सव्वाचार कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याची अनेक विकासकामे झाल्याने गौण खनिजाच्या रॉयल्टी पोटी गौण खनिज विभागाला भरपूर महसूल मिळाला होता, परंतु यंदा शासकीय कामे तसेच खासगी कामेही बंद झाल्याने त्या तुलनेत वाळू, खडी डबर, क्रेशर, माती याची मागणी कमी झाली. त्यामुळे रॉयल्टीवर त्याचा परिणाम झाला. जिल्ह्यात पंधरा वाळू ठिय्ये निश्चित करण्यात आलेले असले तरी, त्यातील फक्त पाच ठिय्यांचाच लिलाव होऊ शकला आहे व त्यापोटी प्रशासनाला चार कोटींच्या आसपास रक्कम मिळाली. अन्य ठिय्यांचा लिलाव होण्याविषयी साशंकता असून, आजवर चार वेळा जाहीर लिलाव काढूनही त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे पर जिल्ह्यातील वाळू चोरी छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात नाशकात दाखल होत असल्याचीही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने भरारी पथके गठीत करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असली तरी, त्यातून वाळू माफियांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच हल्ले करण्यापर्यंत मजल गाठली आहे. काहींनी पोलीस तसेच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारी करून अधिकाऱ्यांना जेरीस आणण्याचा उद्योग सुरू केल्याने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे. असे असतानाही डिसेंबरअखेर ६४९ बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून चार कोटी २९ लाख ७२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी मार्चअखेर देण्यात आलेले ८९ कोटींचे उद्दिष्ट्यांपैकी जानेवारीपर्यंत ३८ कोटी इतकाच महसूल गौण खनिजापोटी वसूल झाला असून, येत्या दोन महिन्यांत उद्दिष्ट गाठणे कठीण असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)