वसुली घटूनही कर्जवाटपात आठशे कोटींनी वाढ
By admin | Published: August 6, 2016 12:38 AM2016-08-06T00:38:59+5:302016-08-06T00:39:08+5:30
जिल्हा बॅँक : ४० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप कर्ज वाटपात तब्बल ८९४ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इतकेच नव्हे, तर शासन निर्णयानुसार ३१ जुलै अखेर सुमारे सात हजार सभासदांच्या ४० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे लोखंडी तिजोरी खरेदी, सीसीटीव्ही खरेदी, नोकर भरतीसह अन्य कारणांनी बॅँकेची आर्थिक स्थिती काहीशी डळमळीत झालेली असताना आणि मागील वर्षाच्या दुष्काळामुळे कर्जवसुलीवर प्रतिकूल परिणाम झालेला असताना यावर्षी खरिपाच्या कर्ज वाटपात जिल्हा बॅँकेने सढळ हाताने कर्ज दिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह नगदी पिके काढण्याकडे कल वाढविला आहे. सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात ३० जून २०१५ अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने एक लाख ४२ हजार ३१८ सभासदांना ७८३ कोटी ४४ लाख ८० हजारांचे कर्ज वाटप केले होते. त्या तुलनेत यावर्षी दोन लाख २८ हजार ७९८ सभासदांना १६७७ कोटी ७९ लाख ९८ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ८६ हजार ४८० जास्त सभासदांना ८९४ कोटी ३५ लाख १८ हजार जास्तीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
बॅँकेने यंदा चांगला पाऊस झाल्याने खरिपासाठी चांगले कर्ज वाटप केले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी हाच कर्ज वाटपाचा आकडा २२०० ते २३०० कोटींच्या घरात पोहोचला होता; मात्र आता कर्जाचा आलेख १६७७ कोटींपर्यंत खाली उतरला आहे. (प्रतिनिधी)