महापालिकेपेक्षा पाेलिसांची दंड वसुली सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:26+5:302021-04-06T04:14:26+5:30
नाशिक : आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिकेबरोबर पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, दंड वसुलीत महापालिकेपेक्षा पोलीस ...
नाशिक : आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिकेबरोबर पोलिसांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, दंड वसुलीत महापालिकेपेक्षा पोलीस भारी पडत आहेत. सोमवारी एका दिवसात मास्क न लावणाऱ्यांकडून महापालिकेने १८ हजार रूपयांचा दंड वसूल केला तर पोलिसांनी तब्बल १ लाख ११ हजार ५०० रूपये दंड स्वरुपात वसूल केले आहेत. रविवारीही पोलिसांनी एका दिवसात सुमारे अडीच लाख रूपये वसूल केले होते. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, आरोग्य नियमांचे पालन होत नाही, हेच यासाठीचे प्रमुख कारण ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आणि नियमबाह्य पद्धतीने आस्थापना सुरू ठेवणे यासाठी कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेचे कर्मचारी त्याचबरोबर पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या तुलनेत पोलीस कर्मचारी दंड वसुलीत आघाडीवर आहेत. सोमवारी (दि. ५) मास्कचा वापर न करणाऱ्या ३८ जणांकडून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी १९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. यात नाशिक रोड येथे एका नागरिकाकडून पाचशे रूपये, सिडकोत ११ जणांकडून ५,५०० रूपये, सातपूर येथे १३ जणांकडून ६,५०० रूपये, नाशिक पश्चिम विभागात ४ जणांकडून २ हजार रूपये, पंचवटीत दोन जणांकडून एक हजार रूपये, नाशिक पूर्व विभागात ७ जणांकडून ३ हजार ५०० रूपये याप्रमाणे १९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी एकाच दिवसात २२३ नागरिकांकडून १ लाख ११ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल आणि नियमबाह्य पद्धतीने आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल नाशिक महापालिकेने ३५ हजार रूपये दंड वसूल केला आहे. यात पूर्व व पश्चिम विभागात एका आस्थापनेकडून पाच हजार रूपये, सिडकोत दोघांकडून दहा हजार रूपये आणि पंचवटीत तिघांकडून पंधरा हजार रूपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे. तर महापालिकेने २८ जणांकडून ६० हजार रूपये दंड वसूल केला आहे.
इन्फो...
सुट्टीच्या एका दिवसात अडीच लाख वसूल
रविवारी (दि. ४) महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या ४४ जणांकडून २२ हजार रूपयांचा दंड वसूल केला तर पोलिसांनी एकाच दिवसात २३६ जणांना दंड करून २ लाख ४७ हजार रूपये वसूल केले आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करताना अनेक अडथळे येतात तसेच भाऊ, दादांचे फोनही येतात. पोलिसांचे मात्र तसे नसून, खाक्या दाखवला की नागरिक निमुटपणे दंड भरत असल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.