तक्रारदारच अस्तित्वात नसताना वसुलीचे आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:13 AM2021-04-13T04:13:35+5:302021-04-13T04:13:35+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गाळेधारकांकडून भाडे वसूल करून ते बाजार समितीच्या खात्यात जमा केले जात नव्हते, अशी ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गाळेधारकांकडून भाडे वसूल करून ते बाजार समितीच्या खात्यात जमा केले जात नव्हते, अशी तक्रार पिंप्री सय्यद येथील रामनाथ सखाराम ढिकले यांनी सहनिबंधक कार्यालयाकडे केली होती. यावरून बाजार समितीच्या निधीच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करून सुरगाणा येथील चौकशी अधिकारी सहाय्यक निबंधक माधव शिंदे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सादर केला होता. त्या अहवालानुसार जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी गेल्या सोमवारी (दि.५) सभापती देवीदास पिंगळे यांच्यासह ११ संचालक व सचिव अरुण काळे यांच्याकडून १ कोटी १६ लाख ५७ हजार रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या प्रकरणातील तक्रारदार असलेली रामनाथ ढिकले नामक व्यक्ती संबंधित पत्त्यावर राहतच नसल्याचे उघड झाले आहे. तसा दाखला पिंप्री सय्यद या ग्रामपंचायतीने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, यानिमित्त अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर सहनिबंधक कार्यालयाने तक्रारदाराची खातरजमा केली होती की नाही? कधी तक्रारदाराला तक्रारीसंदर्भात शहानिशा करण्यासाठी आपल्या कार्यालयात बोलावले होते की नाही? की कुणाच्या सांगण्यावरून हे आदेश देण्यात आले, असे एक ना अनेक प्रश्न बाजार समिती वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.