नाशिक जिल्ह्याचा रिकव्हरी रेट राज्याच्या तुलनेत २ टक्के अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:41 AM2020-12-17T04:41:17+5:302020-12-17T04:41:17+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्यात आता कोरोनाचे प्रमाण खूप कमी झाले असून, बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील ९५ टक्क्यांच्या आसपास ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यात आता कोरोनाचे प्रमाण खूप कमी झाले असून, बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील ९५ टक्क्यांच्या आसपास आहे. राज्याच्या रिकव्हरी रेटच्या तुलनेत नाशिकचा दर सातत्याने २ ते ३ टक्के अधिक असल्याने नाशिकचा मृत्यूदरदेखील राज्याच्या तुलनेत सुमारे अर्ध्या टक्क्याने कमी आहे.
नाशिक जिल्ह्यात रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक होते. त्यात काही काळ नाशिकची ॲक्टिव्ह रुग्ण संख्या एकाचवेळी १० हजारांवर पोहोचली होती. सप्टेंबर महिन्यात तर दोन हजारांहून अधिक रुग्ण एकाच दिवशी आढळू लागल्याने सर्व यंत्रणा हादरून गेली होती. मात्र, त्या काळातदेखील रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला राहिल्याने हळूहळू हे प्रमाण कमी होत दिवाळीच्या कालावधीपर्यंत ॲक्टिव्ह रुग्णसंख्या तीन हजारांपेक्षाही कमी झाली होती. त्यावेळी नाशिक जिल्ह्याच्या रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर गेला होता. मात्र, दिवाळीच्या कालावधीत बाजारात उसळलेली गर्दी तसेच एकमेकांमध्ये मिसळण्याचे प्रमाणदेखील वाढल्यामुळे पुन्हा काही प्रमाणात रुग्ण वाढायला लागले. त्यामुळे ही ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा साडेतीन हजारांमध्ये पोहोचली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात रिकव्हरी रेटची घसरण होऊन तो ९४ टक्क्यांपर्यंत गेला होता. तोच रिकव्हरी रेट या आठवड्यात ९५ टक्क्यांवर पोहोचला असल्याने आरोग्य यंत्रणेलादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे.
इन्फो
कोमॉर्बिड रुग्णांनाच अधिक धोका
दिवाळीच्या काळात १६ नोव्हेंबरला अवघ्या १०७ रुग्णसंख्येपर्यंत पोहोचलेला आकडा नोव्हेंबर अखेरीसपासून डिसेंबरच्या पूर्वार्धात सातत्याने तीनशेपर्यंत पोहोचू लागला आहे. बाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असलेले कोमाॅर्बिड प्रकारातील आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.