पाच थकबाकीदारांकडून सहा लाखांची वसुली
By admin | Published: March 9, 2017 01:58 AM2017-03-09T01:58:33+5:302017-03-09T01:59:11+5:30
नाशिकरोड : मनपानेथकीत घरपट्टी, पाणीपट्टीच्या रक्कम वसुलीबाबत ‘ढोल बजाओ’ उपक्रमाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशी पाच जणांकडून तब्बल १६ लाख रुपयांची धनादेशाद्वारे वसुली केली आहे
नाशिकरोड : मनपानेथकीत घरपट्टी, पाणीपट्टीच्या रक्कम वसुलीबाबत ‘ढोल बजाओ’ उपक्रमाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशी पाच जणांकडून तब्बल १६ लाख रुपयांची धनादेशाद्वारे वसुली केली आहे. दत्तमंदिर सिग्नल शेजारील वैथरा इमारतीचे बेसमेंट सील करण्यात आले आहे.
मनपाने गेल्या अनेक वर्षांपासून थकलेली पाणीपट्टी, घरपट्टी, विविध कर आदिंच्या वसुलीसाठी संबंधित थकबाकीदारांकडे जाऊन थकीत वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम हाती घेतली आहे. यामुळे थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी नाशिकरोडला ६७ हजारांची थकीत वसुली करण्यात आली होती.
मनपा उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर तसेच घरपट्टी, पाणीपट्टी विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी मंगळवारी ढोल-ताशा पथक सोबत घेऊन जेलरोड येथील एका मंगल कार्यालयाजवळ ‘ढोल बजाओ’ उपक्रम राबविला. यावेळी संबंधित थकबाकीराने साडेचार लाखांचा आजच्या तारखेचा धनादेश व ६ लाख ७० हजार रुपयांचा तीन दिवसांनंतरचा धनादेश दिला. आर्टिलरी सेंटररोड येथील एका रो-हाउस मालकाने ७७ हजार, जेलरोड दसक भागातून दोघा थकबाकीदारांनी मिळून ९३ हजारांचा एका धार्मिक स्थळाजवळील लॉजिंग दुकानांची थकलेली ३ लाख १७ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे वसूल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी तब्बल १६ लाखांची थकबाकी धनादेशाद्वारे वसूल करण्यात आली. तर आशीर्वाद बस थांब्याजवळील एका बॅँकेला भाडेतत्त्वावर दिलेल्या गाळ्याची घरपट्टी थकीत आहे. त्यासंदर्भात संबंधित गाळे मालकधारकांशी २४ लाखांच्या थकबाकीबाबत मनपा अधिकाऱ्यांचे बोलणे झाले असून, येत्या तीन-चार दिवसांत संबंधित मालक ती रक्कम देणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. मनपाच्या ‘ढोल बजाओ’ उपक्रमाचा थकबाकीदारांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत असून थकीत रक्कमेची वसुली वाढू लागली आहे. मनपाने थकबाकीदारांकडे मोठ्या प्रमाणात वसुली मोहीम राबवावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)