तांत्रिक दोष सारून आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:50 PM2020-03-05T19:50:26+5:302020-03-05T19:53:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात येणा-या कर्मचारी भरतीतील तांत्रिक दोष दूर करण्यात आले असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत करण्यात येणा-या कर्मचारी भरतीतील तांत्रिक दोष दूर करण्यात आले असून, गेल्या दोन दिवसांपासून सुमारे दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांना थेट नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या भरतीविषयी उमेदवारांकडून केले गेलेले आरोप जिल्हा परिषद प्रशासनाने फेटाळून लावतानाच भरती पारदर्शी पद्धतीने झाल्याचा दावा केला आहे.
गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आरोग्य खात्यांतर्गत नर्सिंग, आरोग्य सेविका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समन्वयक, सल्लागार, वैद्यकीय अधिकारी अशा पदांसाठी सुमारे २५० हून अधिक कर्मचारी, अधिकाºयांची भरती प्रक्रिया निवड समितीमार्फत राबविण्यात आली. तथापि, या भरतीला मार्च महिन्यात मुहूर्त लागला आहे. या भरतीसाठी शासकीय व निमशासकीय सेवेत काम केल्याचा अनुभव असणे क्रमप्राप्त करण्यात आले होते. मात्र, काही उमेदवारांनी खासगी रुग्णालयांमध्ये केलेल्या कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सादर केल्यामुळे गोंधळ उडाला होता. खासगी रुग्णालयाच्या अनुभव प्रमाणपत्रालाही गुणदान करण्यात आल्याने अनेक उमेदवारांची नावे यादीत समाविष्ट झाली होती. प्रत्यक्षात दुसºया यादीतून या उमेदवारांची नावे कमी करण्यात आल्याने या भरतीत गैरप्रकार केल्याच्या संशयाला पुष्टी मिळत होती. तथापि, निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भरतीसाठी शासनाने लागू केलेल्या नियमानुसारच भरती करण्याचे ठरवून सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी करण्याच्या सूचना दिल्या व त्यातून खासगी रुग्णालयातील अनुभवाचे प्रमाणपत्र ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतल्यामुळे या भरतीसाठी निव्वळ शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील अनुभवच वैध ठरविला. त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करून एका जागेसाठी तीन उमेदवारांना निवडीसाठी बोलाविण्यात आले. बुधवारी व गुरुवारी दोन्ही दिवस रिक्त असलेल्या जागांवर समुपदेशनाने जागेवरच नियुक्तीपत्र देऊन प्रशासनाने पारदर्शी भरती करून संशयाला दूर ठेवले आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे दीडशेहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.